लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी होत आहे. या बैठकीला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले असून, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार यादेखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच पवार कुटुंबीयांतील चौघे या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
या बैठकीत जिल्ह्याचा चालू आर्थिक वर्षाचा आराखडा निश्चित होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता यंदा सत्ताधारी आमदारांच्या शिफारशीनुसार भरघोस निधी दिला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी ४० टक्के, तर भाजप आणि शिवसेना यांच्यासाठी ३० टक्के असे गुणोत्तर निश्चित करण्यात आल्याची चर्चा असून विरोधी पक्षातील आमदारांना या निधीत फारच कमी वाटा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, आमदारांनी बैठकीपूर्वीच कामांची यादी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे देऊन ठेवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार या उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, पवार कुटुंबातील चार सदस्य बैठकीला हजर राहण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
हेही वाचा >>>मतदान केंद्रात केवळ १५०० पर्यंतच मतदार; निवडणूक आयोगाची सूचना
गेल्या वर्षी १९ मे रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती. या बैठकीला ज्येष्ठ नेते खासदार पवार यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, त्यांनी कामकाजात कोणत्याही प्रकारचा सहभाग नोंदविला नव्हता.
शरद पवारांना बैठकीचे निमंत्रण
बारामतीमध्ये ‘नमो रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे निमंत्रण खासदार पवार यांना न देण्यावरून गदारोळ झाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडून पवार यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले.