केंद्रीय मंत्री जोतीरादित्य सिंदिया काँग्रेस सोडून भाजपामध्ये येऊन आता तीन वर्ष झाली आहेत. या काळात सिंदिया यांच्याशी उघडपणे वाद केल्यानंतर भाजपाचे कोलारस विधानसभेचे आमदार वीरेंद्र रघुवंशी यांनी अखेर भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. मागच्या काही दिवसांत ग्वाल्हेर-चंबळ या सिंदिया यांच्या कार्यक्षेत्रातील भाजपाच्या चार नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. रघुवंशी यांनी राजीनाम्यात सिंदिया यांच्यावर थेट आरोप केले. रघुवंशी यांच्या आधी ज्या तीन नेत्यांनी भाजपाला रामराम ठोकला त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र रघुवंशी यांनी अद्याप त्यांच्या पुढच्या निर्णयाची माहिती दिलेली नाही. रघुवंशी हे २०१४ पर्यंत काँग्रेसमध्येच होते, मात्र सिंदिया यांच्याबरोबरचे मतभेद वाढल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, रघुवंशी २ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. रघुवंशी म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करून सिंदिया यांनी काँग्रेसला खिंडार पाडले होते, ज्यामुळे काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपाचे सरकार आले. पण भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा विषय लावून धरला नाही.

आमदार रघुवंशी यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिले की, शिवपुरी जिल्हा आणि माझ्या कोलारस विधानसभा मतदारसंघात भ्रष्ट अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. माझ्या विकासात्मक कामांमध्ये अडथळे निर्माण करणे आणि माझा छळ करण्याचे काम या लोकांकडून केले जात आहे. राज्यभरातील आणि विशेषतः शिवपुरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सहकारी बँकामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही रघुवंशी यांनी केला. तीन वर्षांपूर्वी घोटाळा उघड झाला, मात्र आजही शेतकरी आपले पैसे मिळवण्यासाठी रांगेत उभे राहत आहेत. शेतकऱ्यांना त्यांनी बँकेत जमा केलेली रक्कम परत मिळत नाही, दुसरीकडे सरकार यावर काहीही कारवाई करत नाही, असाही आरोप रघुवंशी यांनी केला. या घोटाळ्यासंदर्भात मी विधानसभेत आवाज उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते व्यर्थ ठरले, असेही ते म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारवरही रघुवंशी यांनी टीका केली. भाजपाने गोमातेच्या नावावर मतदान मिळवले आणि गोमातेला वाचविण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. गायींच्या निवाऱ्यासाठी राखीव ठेवलेले अनेक शेड वापरात नाहीत. तसेच मागच्या चार-पाच महिन्यांपासून या निवारा केंद्रांना निधी मिळालेला नाही. यामुळे गायींचा रस्त्यावरच मृत्यू होत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. रघुवंशी म्हणाले की, माझे हे दुःख मी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भाजपाच्या इतर नेत्यांसमोर व्यक्त केले होते, पण कुणीही याला महत्त्व दिले नाही. ग्वाल्हेर-चंबळ खोऱ्यातील माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांकडे नवीन आलेल्या लोकांमुळे दुर्लक्ष केले जात आहे. (सिंदिया यांच्यासोबत आलेल्या नेत्यांमुळे) भाजपाशी एकनिष्ठ असलेले नेते, कार्यकर्ते जे समर्पक वृत्तीने काम करत होते, त्यांना बाहेरून आलेल्या लोकांमुळे मोठी किंमत मोजत आहेत.

रघुवंशी आणि सिंदिया यांच्या गटात वाद होते, हे सिंदिया यांचे निकटवर्तीयदेखील मान्य करतात. तथापि, आमदार रघुवंशी यांना पुढील निवडणुकीत कोलारस मतदारसंघातून तिकीट मिळणार नाही, अशी त्यांना भीती होती, त्यामुळेच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णच घेतला असावा, अशी अटकळ बांधण्यात येत आहे.

रघुवंशी आणि सिंदिया यांच्यात २०१३ च्या निवडणुकीपासून वादाला सुरूवात झाली. त्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत रघुवंशी यांनी काँग्रेसच्या तिकीटावर सिंदिया यांच्या आत्या आणि भाजपाच्या उमेदवार यशोधरा राजे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. राजे यांच्याकडून रघुवंशी यांचा पराभव झाला होता, या पराभवासाठी त्यांनी सिंदिया यांना जबाबदार धरले होते, असा आरोप सिंदिया यांचे समर्थक करतात. “यशोधरा राजे या सिंदिया यांच्या आत्या आहेत आणि ते उघडपणे त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाहीत”, असा प्रतिवाद सिंदिया  यांचे निकटवर्तीय करतात.

२०१८ मधील विधानसभा निवडणुकीत रघुवंशी यांनी भाजपाकडून कोलारस विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि काँग्रेसचे उमेदवार तसेच सिंदिया यांचे समर्थक महेंद्र यादव यांचा पराभव केला.

आणखी एक काँग्रेसचे माजी नेते भाजपामधून काँग्रेसमध्ये यापूर्वी आले. ते म्हणाले की, भाजपामध्ये त्यांची घुसमट होत होती.

Live Updates