अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्यासाठी चर्चेचे गुऱ्हाळ पुन्हा एकदा सुरू झाले. गेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये आघाडी करण्यावरून काँग्रेस व ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा घडून येते. मात्र, एकमत होत नसल्याने अखेर दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुका लढतात. यावेळेस देखील पुन्हा त्याच दिशेने वाटचाल सुरू झाली. आघाडीसाठी सकारात्मक असल्याचे चित्र दोन्ही बाजूने तयार केले. मग नेमके अडले कुठे? खरंच आघाडी करायची की वातावरण निर्मिती? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. देशातील विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ व राज्यातील ‘मविआ’मध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश नाही. वंचितने शिवसेनेच्या ठाकरे गटाशी युती केली. भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेस व ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येण्याची चर्चा प्रत्येक लोकसभा निवडणुकीत होत असते. १९९८ आणि १९९९ च्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस व ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी केली होती. त्यावेळी अकोला मतदारसंघातून ॲड. प्रकाश आंबेडकर सलग दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर २००४, २००९, २०१४ व २०१९ च्या सलग चार लोकसभा निवडणुकांमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढले. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस व ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडीवरून चर्चेचे सत्र चालते.
हेही वाचा : दुष्काळाच्या तोंडावर शिंदेसेना शेतकऱ्यांच्या बांधावर
वारंवार काँग्रेस पक्षाकडे प्रस्ताव देऊनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे, तर काँग्रेस नेतेही आघाडीसाठी सकारात्मक असल्याचे वारंवार सांगतात, मात्र प्रत्यक्षात कृती होत नाही. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतात. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून केवळ प्रसारमाध्यमांमधूनच चर्चा रंगत असते. प्रत्यक्षात तडजोड होत नसल्याने अखेरच्या क्षणी दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरतात, हा गेल्या चार निडणुकीतील इतिहास आहे. त्यामुळे राज्यात मतविभाजन होऊन काँग्रेस व वंचितचे नुकसान होते, तर भाजपला त्याचा थेट फायदा होता. काँग्रेस व वंचितमध्ये पाडापाडीचे राजकारणात देखील होते. याचा प्रत्यय अकोला मतदारसंघात सातत्याने आला आहे.
हेही वाचा : ‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य धोक्यात ? काँग्रेस आणि आपमधील दरी रुंदावली
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व वंचितमध्ये आघाडीवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना १ सप्टेंबरला लेखी प्रस्ताव पाठवूनही त्यांच्याकडून कुठलेही उत्तर आले नसल्याचे सांगत ॲड. प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर राज्यातील ४८ जागांवर तयारी सुरू केल्याचे स्पष्ट केले. या अगोदरच अकोल्यातून स्वत:ची उमेदवारी जाहीर करून ॲड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला कोंडीत पकडले आहे. काँग्रेसने अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही. ॲड. प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी आम्ही इच्छूक असल्याचे वारंवार काँग्रेसकडून सांगण्यात येते. मग काँग्रेस आणि वंचितमधील आघाडीचे घोडे नेमके अडते कुठे? असा प्रश्न निर्माण होतो. यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता काँग्रेस व वंचितमध्ये आघाडी होण्याची शक्यता कमीच असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
हेही वाचा : म्यानमारच्या निर्वासितांची बायोमेट्रिक तपासणी करणार नाही; मिझोरामच्या सरकारने केंद्राचे आदेश धुडकावले
राज्यातील काँग्रेस नेते सकारात्मक
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडी स्थापन करून पक्षाचा मोठा विस्तार केला. राज्यातील विविध मतदारसंघात वंचित आघाडीची विशिष्ट मतपेढी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतविभाजनामुळे काँग्रेसचे नुकसान झाले. राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा त्याचा मोठा फटका बसला होता. ॲड. प्रकाश आंबेडकरांची साथ मिळाल्यास मतविभाजन टळून काँग्रेसला लोकसभेच्या अनेक मतदारसंघात फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते वंचितशी आघाडी करण्यासाठी सकारात्मक आहे. तसा त्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाकडे आग्रह देखील धरल्याची माहिती आहे. मात्र, राज्यातील नेत्यांना आघाडीचे अधिकार आहेत का? असा सवाल ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित करतात. “काँग्रेसला लेखी पत्र पाठवूनही त्यांच्याकडून उत्तर आलेले नाही. त्यांच्यात लवकरच एकमत होण्याची शक्यता नाही. वाट पाहणे किंवा त्यांच्या फसवणुकीत अडकणे आम्हाला परवडणारे नाही. गरज पडल्यास आम्ही सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवू”, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.