आसाराम लोमटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परभणी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्षपदांच्या नियुक्त्या केल्या आहेत. परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संतोष मुरकुटे तर महानगर जिल्हाध्यक्षपदी राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुरकुटे यांच्या नियुक्तीनंतर गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष व भाजप पदाधिकार्यांचे दावे- प्रतिदावे सुरू झाले आहेत. भाजप आणि राष्ट्रीय समाज पक्ष हे मित्र पक्ष असले तरी रासपचे नेते महादेव जानकर यांनी अलीकडे भाजपच्या विरोधात घेतलेली भूमिका लक्षात घेता या दोन मित्र पक्षांमध्ये अंतर वाढू लागल्याची लक्षणे आहेत.

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात ‘कमळ’ फुलविणार असल्याचे मुरकुटे यांनी जाहीर केले तर गंगाखेड मतदारसंघात आता ‘रासप’चा विषय संपला, यापुढे गंगाखेडचा उमेदवार भाजपचा असेल असे मुरकुटे यांच्या समर्थकांनी जाहीर केले आहे. त्यावर रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या समर्थकांनी प्रत्युत्तर देवून भाजप पदाधिकार्यांनी आपले बेताल वक्तव्य थांबवावे, असा इशारा दिला आहे. एकुणच भाजप व रासप या परस्परांचे मित्रपक्ष असलेल्या पक्षांमध्येच सध्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.

हेही वाचा >>> ड्रायपोर्ट उभारणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सत्ताधारी तिन्ही खासदारांमध्ये स्पर्धा

एकेकाळी ताब्यात असलेला हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशावेळी ‘रासप’च्या गुट्टे यांची पुढची रणनिती काय असेल याबाबत औत्सुक्य आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या ताब्यात आहे. आमदार रत्नाकर गुट्टे हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाने नुकतीच ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संतोष मुरकुटे यांची नियुक्ती केली आहे. मुरकुटे यांनी एक वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या मतदारसंघात आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

हेही वाचा >>> मल्लिकार्जुन खरगे यांचा माइक बंद; संसदेतील खासदारांच्या माइकचे नियंत्रण कुणाकडे असते?

गेल्यावर्षी २६ नोव्हेंबरला मुरकुटे यांनी या मतदारसंघात मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. रावसाहेब दानवे व डॉ. भागवत कराड हे दोन केंद्रीय मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते. या दोन्हीही नेत्यांनी त्यावेळी गंगाखेडची जागा भाजपला सोडवून घेण्याचा शब्द तर दिलाच पण मुरकुटे यांना ‘कामाला लागा’ असा संदेशही दिला होता. आता मुरकुटे यांची थेट जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्याने गंगाखेड मतदारसंघावर हळुहळु भारतीय जनता पक्ष आपला दावा करण्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजपचा मित्रपक्ष असला तरी पक्षाचे नेते महादेव जानकर आणि भाजपमध्ये पडत असलेल्या अंतराच्या पार्श्वभूमीवर गंगाखेडला भाजपची पायाभरणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा >>> मनसेला टोलनाका विषयाचा राजकीय लाभ किती?

मुळात युतीच्या गणितात गंगाखेड हा विधानसभा मतदारसंघ कायम भाजपच्या वाट्याला असायचा. २००४ च्या निवडणूकीत विठ्ठल पुरभाजी गायकवाड हे या मतदारसंघातून भाजपचे आमदार राहिले. तत्पूर्वी हा मतदारसंघ दीर्घकाळ शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात होता. २००९ मध्ये हा मतदारसंघ राखीव मधून खुल्या प्रवर्गात बदलला. त्यानंतर भाजपकडून २००९ साली मधुसुदन केंद्रे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सध्या रासपचे रत्नाकर गुट्टे या मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजप व रासप या दोन मित्रपक्षातला संघर्ष आता सुरू झाला आहे, तो पुढे कोणत्या वळणावर जातो याबाबत औत्सुक्य आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friendship between bjp and rashtriya samaj party print politics news ysh
Show comments