अलिबाग – राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो असे म्हणतात. याचा प्रत्यय आता रायगडकरांना येतोय. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये धुसफूस संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या दृष्टीने दोन्ही पक्षांकडून सकारात्मक पावले टाकली जात असून, गाठीभेटी आणि बैठकांना वेग आला आहे.
दोन्ही पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांची महत्त्वाची बैठक काल मुंबईत पार पडली. महायुतीमधील सर्वच पक्षांनी यापुढे समन्वयाने काम करत सर्व निवडणुका एकदिलाने लढवण्यावर कालच्या बैठकीत एकमत झाले. आज पुन्हा शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप यांची संयुक्त बैठक मुंबईत बोलावण्यात आली आहे.
रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुक्तागिरी बंगल्यावर झालेल्या या बैठकीस उदय सामंत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, राजा केणी आदी उपस्थित होते. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांत झालेली दिलजमाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
आजच्या बैठकीत जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर सांगोपांग चर्चा झाली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीपासून पुढील सर्व निवडणुका एकत्रितपणे लढवण्यावर आजच्या बैठकीत एकमत झाले. महायुतीमध्ये महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षालाही यात विश्वासात घेण्यात येणार आहे. त्यासाठी आज तीनही पक्षांच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक मुंबईत बोलावण्यात आली आहे, अशी माहिती आमदार महेंद्र दळवी यांनी दिली.
गेल्या चार वर्षांपासून दोन्ही पक्षात धुसफूस सुरू होती. रायगडचे पालकमंत्रीपद वादाचा कळीचा मुद्दा ठरला होता. आदिती तटकरे शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करतात. आमदारांच्या कामाचे श्रेय घेतात. विकास निधी दिला जात नाही, असा आक्षेप शिवसेना आमदारांचा होता. त्यामुळे दोन्ही पक्षांचे संबध जिल्ह्यात कमालीचे ताणले गेले होते. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सहभागी झाल्यानंतरही आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री नकोच ही भूमिका शिवसेना आमदारांनी कायम राखली होती. मात्र गेल्या काही दिवसांत आमदार भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांनी हा तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
हेही वाचा – मध्य प्रदेश-राजस्थान-छत्तीसगढमध्ये स्थानिक नेतृत्व भाजपच्या यशातील अडचण?
आदिती तटकरे बैठकीपासून दूर
शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चर्चेची दालने खुली होत असताना, बैठकांची चर्चा सुरू असताना राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे आणि विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे हे बैठकांपासून दूर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार सुनील तटकरेच पक्षाकडून चर्चेची बाजू संभाळताना दिसत आहेत.
पालकमंत्रीपदावर शिवसेना ठाम
या बैठकीत रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. आगामी निवडणुका आणि दोन्ही पक्षांतील समन्वय वाढविण्यावर या बैठकीत चर्चा झाली. विकास कामांना गती देण्याबाबत दोन्ही पक्षांचे एकमत झाले. असे असले तरीही आमचा पालकमंत्रीपदासाठी आग्रह कायम आहे. घटस्थापनेनंतर राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार होईल, यात भरत गोगावले यांची वर्णी लागेल आणि तेच रायगडचे पालकमंत्री होतील असे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी स्पष्ट केले.