गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. ते एकीकडे उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत मराठा समाज ठिकाठिकाणी आंदोलन करत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाची सध्या काय स्थिती आहे? या आंदोलनाला कधीपासून धार मिळाली? हे जाणून घेऊ या….
मराठा आंदोलनाची धार तीव्र
मराठा आरक्षणाचा लढा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून लढवला जात आहे. २०१६ सालापासून या आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आहे. मराठा समाजाला उद्भवणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांना वाचा फोडण्यासाठी उभे राहिलेल्या या आंदोलनाला आता मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक राजकीय पक्ष या मराठा आंदोलनाचा आता राजकीय अंगाने विचार करत आहेत.
जरांगे यांचे उपोषण सरकारसाठी चिंतेचा विषय
याआधी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व मराठा क्रांती मोर्चाने केले. या आंदोलनाला कोणताही एक चेहरा नव्हता. सध्या मात्र या लढ्याचे नेतृत्व जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आले आहे. आपल्या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातील उपोषणानंतर जरांगे यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. सकारने लवकरात लवकर मराठा आरक्षण द्यावे. सरकारने आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. आंदोलनाचा दुसरा टप्पा सरकारला झेपणार नाही, असा इशारा ते आपल्या भाषणांतून देत होते. सध्या जरांगे यांनी २५ ऑक्टोबरपासून आपल्या उपोषणाच्या माध्यमातून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. जरांगे यांच्या समर्थनार्थ बीड, सांगली, जालना, इंदापूर, पंढरपूर, कोल्हापूर, परभणी या ठिकाणी आंदोलनं करण्यात आली आहेत. याच कारणामुळे जरांगे यांचे उपोषण सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
योग्य तोडगा काढण्याचेही सरकारपुढे आव्हान
मनोज जरांगे हे उपोषणाला बसल्यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा म्हणून राज्यातील आमदार तसेच खासदारांना राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे. काही आमदारांनी स्वत:हून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. याच कारणामुळे मराठा समाजाला संतुष्ट करण्याचे तसेच मराठा आरक्षणावर लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे.
आरक्षणासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न – फडणवीस
मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मराठा समाज आक्रमक झाल्यामुळे सध्या राज्य सरकारमध्ये अस्वस्थता आहे. जरांगे उपोषणाला बसल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही मराठा आरक्षण देण्याच्या भूमिकेत आहोत. राज्य सरकार म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहोत, असे स्पष्टीकरण दिले. तसे त्यांनी जरांगे यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहनही केले. “मनोज जरांगे यांनी आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये, कारण जीवन अमूल्य आहे. जरांगे यांच्यासोबत जे आहेत, त्यांनी त्यांची काळजी घ्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. जरांगे यांनी आमच्यावर विश्वास ठेवावा”, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
१९८२ साली आरक्षणासाठी पहिला मोर्चा
मराठा आरक्षणाची मागणी ही खूप जुनी आहे. दिवंगत माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी १९८२ साली मराठा आरक्षणासाठी पहिल्यांदा मोर्चा काढला होता. याच मागणीसाठी त्यांनी आत्महत्या केली. तेव्हापासून मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटल्यानंतर अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र तसेच कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “गरीब मराठा समाजाच्या हक्कांसाठी माझ्या वडिलांनी बलिदान दिले. सरकारने या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी माझी विनंती आहे”, असे नरेंद्र पाटील म्हणाले.
कोपर्डी प्रकरणानंतर आंदोलन तीव्र
कोपर्डी गावातील एका मुलीवर चार तरुणांनी बलात्कार करून तिचा खून केल्यानंतर मराठा समाज संतप्त झाला होता. याच घटनेनंतर मराठा आरक्षणाला धार मिळाली. या घटनेनंतर ९ ऑगस्ट २०१६ रोजी संभाजीनगर शहरात मोठ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे हा मूक मोर्चा होता. या मोर्चातील आंदोलक काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आले होते. तसेच या मोर्चामध्ये कोणतीही घोषणा नव्हती किंवा भाषणही नव्हते.
राज्यभर शांततेत मोर्चे
त्यानंतर या मूक मोर्चाचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले. पुढच्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ५८ मोर्चे काढण्यात आले. हे सर्व मोर्चे अगदी शांततेत पार पडले. या मोर्चाच्या माध्यमातून कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा द्यावी, शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळावा यासाठी स्वामीनाथ आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशा अनेक मागण्या या मोर्चांच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या. याच मोर्चासंदर्भात बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे म्हणाले की, “आम्ही कोणत्याही हिंसेचे समर्थन केलेले नाही. सरकारपुढे आमच्या मागण्या मांडणे तसेच न्याय मागणे हाच आमचा उद्देश होता. आमचे सर्व मोर्चे हे शांततेत पार पडले.”
सरकार मराठा आरक्षणावर काय तोडगा काढणार?
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे. बसेस तसेच खासगी आणि सरकारी मालमत्तेचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. असे असतानाच दुसरीकडे जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात सरकार मराठा आरक्षणावर काय तोडगा काढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.