राज्यातील सत्तांतरानंतर नागरिकांनी सर्वाधिक उत्सुकता होती ती शिवसेनेच्या म्हणजेच ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यांची. अखेर काल विजयादशमीच्या दिवशी दसरा मेळावे पार पडले. यामध्ये अपेक्षेप्रमाणे विरोधकांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला गेला. ज्यानंतर आता सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळातही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिंदे, ठाकरेंच्या मेळाव्या व्यतिरिक्त भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचाही दरवर्षीप्रमाणे सावरगावत दसरा मेळावा पार पडला. याशिवाय देशभरात राजकीय मंडळींनीही दसरा विविध प्रकारे साजरा केला.

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशच्या बिलासपूरमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) उद्धाटन केले आणि एका सभेला संबोधितही केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कर्नाटकमधील एका मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगण राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती ठेवले.

तर भारत जोडो पदयात्रेनिमित्त काँग्रेस नेते हे सध्या कर्नाटकात आहेत. काल दसऱ्याच्या निमित्त त्यांनी द्वेषाची लंका जळो, हिंसेच्या मेघनाथ मिटो, अहंकराच्या रावणाचा अंत हो, सत्य आणि न्यायाचा विजय हो. सर्व देशवासियांना विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा.. असं ट्वीट करत शुभेच्छा दिल्या. याशिवाय, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, शशी थरूर, अशोक गहलोत आदींसह देशभरातील अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यातून विविध प्रकारे दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपला विजयादशमी उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर येथे या उत्सवात सहभागी होत, स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी त्यांच्या निवासस्थानी शस्त्रपूजन करून दसरा साजरा केला. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील प्रसिद्धि रामलिला मैदानात रावण दहन कार्यक्रमास उपस्थित राहून नागरिकांसोबत दसरा साजरा केला. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उज्जैन येथे जाऊन महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतले.

Story img Loader