जयेश सामंत
ठाणे : भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटनात्मक बांधणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दौरे सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून ते शुक्रवारपासून ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. पुढील तीन दिवस म्हणजेच रविवारपर्यंत असलेल्या या दौऱ्यामध्ये ते ठाणे, भिवंडी आणि मिरा-भाईंदर भागातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध समाजाचे नेते, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या बैठका घेणार आहेत. त्यांचा शनिवारी ठाणे शहरात दौरा होणार असून त्यात दिवसभर बैठकांच्या सत्रासह कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या घरी दुपारचे भोजन करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकींच्या दृष्टीकोनातून त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
हेही वाचा… राजकारणापासून दूर राहण्याची माधवराव मोरे यांची भूमिका कायम चर्चेत
भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तीन दिवस ठाणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. यानंतर ते शनिवार ५ नोव्हेंबरला ठाणे शहरात तर, रविवार ६ नोव्हेंबरला मीरा-भाईंदर शहरात दौरा करणार आहेत. या तीन दिवसीय दौऱ्यात ते भाजपा कार्यकर्ता दुचाकी रॅली, जिल्हा संघटनात्मक मेळावा, सोशल मीडिया बैठक, धन्यवाद मोदीजी कार्यक्रमाअंतर्गत दोन लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार आहेत. बुथ समिती बैठकांसह युवा वॉरिअर शाखांचेही उद्घाटनही करणार आहेत. यासोबतच विविध सामजिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन ठाणे भाजपा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा… गुजरातमध्ये तिरंगी लढत भाजपलाच सोयीची; ‘आप’मुळे निवडणुकीत रंगत वाढणार
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे शुक्रवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११.३० वाजता सिटी सेंटर धामणकरपासून ते गोपाळ नगर पर्यंत दुचाकी रॅलीत सहभागी होणार आहेत. दुपारी १२ वाजता गोपाळ नगर येथील पाटीदार हॉलमध्ये जिल्हा संघटनात्मक बैठकीला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ३.५० वाजता रन रिअल्टर्स, लक्ष्मण म्हात्रे चौक टेमघर पाडा व सायंकाळी ६ वाजता हुनमान नगर ताडाळी रोड येथे धन्यवाद मोदीजी अभियानअंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार आहेत. दुपारी ४.१५ वाजता शांतीनगर, गोविंद नगर येथे बुथ कमिटी बैठक घेणार आहेत. ४.५५ वाजता सामाजिक कार्यक्रमास उपस्थिती आणि ५.२० वाजता मानसरोवर भिवंडी येथे युवा वॉरिअर शाखेचे उद्घाटन करणार आहेत.
हेही वाचा… राहुल गांधींसोबत पदयात्रेसाठी नागपूर, चंद्रपुरात काँग्रेस नेत्यांचा मॉर्निंग वॉक सुरू
बावनकुळे यांचा शनिवारी ठाणे शहरात सकाळी ८.३० ते रात्री ११ दौरा होणार आहे. संघ परिवार, संघ परिवाराशी संबंधित संस्था, भाजप जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष यांच्या बैठका घेणार आहेत. दुपारच्या वेळेत कार्यकर्त्याच्या घरी भोजन करणार आहेत. माजिवाडा येथे बुथ कमिटीसोबत बैठक, धन्यवाद मोदीजी कार्यक्रमाअंतर्गत दोन लाभार्थ्यांच्या घरी भेटी, नव मतदार नोंदणी कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. कोळी, वाल्मिकी, मुस्लीम, ख्रिश्चन अशा समाजातील अराजकीय नेत्यांसोबतही ते बैठक घेणार आहेत. उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवरांसोबत तसेच सोशल मीडिया कार्यकर्त्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. जिल्हा संघटनात्मक मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.