पंजाबमधील काँग्रेस आमदाराच्या अटकेनंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमधील दरी अधिकच रुंदावली आहे. आमदारच्या अटकेबद्दल काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत ‘आप’ला आघाडी धर्माची आठवण करून दिली आहे. पंजाबमधील काँग्रेस आमदार सुखपालसिंग खैरा यांना २०१५ मधील अंमली पदार्थाशी संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली. आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने अभय दिले असताना पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारने राजकीय सूडबुद्धीने अटक केल्याचा आरोप आमदार खैरा यांनी केला आहे. आमदार खैरा हे पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारचे टीकाकार मानले जातात.
अलीकडेच आपचे खासदार राघव छड्डा यांचा विवाह समारंभ पार पडला. या शाही विवाहाबद्दल खैरा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत आपबरोबर आघाडी करण्यास त्यांचा ठाम विरोध आहे. आमदाराच्या अटकेबद्दल काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांनीही नाराजी व्यक्त केली. ‘कोणी आमच्यावर अन्याय करीत असल्यास आम्ही ते सहन करणार नाही’, असा इशारा खरगे यांनी आम आदमी पार्टी सरकारला दिला आहे. पंजाब आणि दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचा आपबरोबर आघाडी करण्यास ठाम विरोध आहे. मात्र, इंडिया आघाडीचे घटक पक्ष म्हणून दोन्ही राज्यांमध्ये जुळवून घेण्याची सूचना काँग्रेस नेतृत्वाने केली आहे.
पंजाबमधील काँग्रेस आमदाराच्या अटकेनंतर पंजाबबरोबरच दिल्लीमधील काँग्रेस नेत्यांना संधीच मिळाली आहे. आपशी हातमिळवणी नकोच, अशी त्यांची भूमिका आहे. आमदाराच्या अटकेनंतर खरगे यांनीच आघाडी धर्माबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने काँग्रेस आणि आपमध्ये कितपत जुळेल याबद्दल साशंकता व्यक्त केली जाते. पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीतील ममता बॅनर्जी आणि डावे पक्ष स्वतंत्रपणे उभयतांच्या विरोधात लढणार आहेत. केरळमध्ये डावे पक्ष आणि काँग्रेस स्वतंत्र लढणार आहेत. काँग्रेस आणि आपमधील ताणले गेलेले संबंध लक्षात घेता पंजाब आणि दिल्लीतही आघाडीबाबत साशंकताच व्यक्त केली जाते.