काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. रविवारी राजस्थान येथे बोलत असताना प्रियांका गांधी वाड्रा यांनी जी-२० शिखर परिषदेचा उल्लेख “इनका जी-२०” (त्यांचे जी-२०) असा केला. या विधानावर टीका करत असताना भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पुनावाला म्हणाले, “जी-२० परिषदेवरून इंडिया आघाडीतच एकमत नाही. एकाबाजूला शशी थरूर जी-२० घोषणापत्राचे कौतुक करत आहेत. तर प्रियांका गांधी वाड्रा जी-२० वर टीका करत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जी-२० स्नेहभोजनाला हजेरी लावल्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे नेते सुखविंदर सुखू स्नेहभोजनासाठी उपस्थित राहत आहेत. जेव्हा तुमच्याकडे ध्येय नसते तेव्हाच हे होते. निर्बुद्ध विरोधकांची आघाडी म्हणजे नुसती विसंगती”.
प्रियांका गांधी वाड्रा काय म्हणाल्या
रविवारी सभेत बोलत असताना प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या की, जी-२० परिषद होत असलेल्या मैदानात पाऊसामुळे पाणी साचले. सरकारच्या अहंकाराला एकप्रकारे देवानेच उत्तर दिले आहे. यावेळी बोलत असताना प्रियांका गांधी ‘इनके जी-२०’ असे म्हणाल्या. आजवर देशाची जनता भीतीपोटी जे बोलू शकली नाही, ते देवानेच सांगितले आहे की, अहंकार बाळगू नका. या देशाने तुम्हाला नेते बनविले आहे, त्यामुळे देश आणि जनतेला सर्वात पुढे ठेवा, असेही त्या म्हणाल्या.
प्रियांका गांधी वाड्रा यांच्या विधानावर बोलत असताना भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पुनावाला म्हणाले की, प्रियांका वाड्रा यांच्या पक्षाला टीका करण्याचा अधिकार आहे. पण प्रियांका जी “इनका जी २०” (त्यांचे जी-२०) म्हणाल्या. असे कार्यक्रम यांचा, त्यांचा की भारताचा? ही या कुटुंबाची मानसिक समस्या राहिली आहे. जे काही देशाचे ते यांच्या परिवाराचे, हीच मानसिकता त्या प्रकट करताना दिसल्या.
शशी थरूर काय म्हणाले?
शशी थरूर यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. “जी-२० परिषदेतून आपण जे साध्य केले आहे, ते नक्कीच भारतासाठी मोठे राजनैतिक यश म्हणावे लागेल. कारण हे सर्व नेते भारतात येईपर्यंत याचीच शंका होती की, संयुक्त घोषणापत्र तरी निघू शकेल की नाही. रशिया-युक्रेन युद्धाचे समर्थन करणारे आणि विरोध करणाऱ्यांमध्ये एकमत होणे निव्वळ अशक्य वाटत होते. पण या मुद्द्यावर गेल्या ९ महिन्यांत अशक्य वाटणारा फॉर्म्युला प्रत्यक्षात मंजूर करून घेण्यात सरकारला यश आले आहे. हे भारताचं यश म्हणता येईल”, असे शशी थरूर म्हणाले. मोदी सरकारचे कौतुक करत असताना राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना स्नेहभोजनासाठी बोलवले नसल्याबाबत खेद प्रकट केला. तसेच दिल्ली तीन दिवसांसाठी ठप्प ठेवल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची ममता बॅनर्जींवर टीका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जी-२० शिखर परिषदेसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावली होती. त्यावरून पश्चिम बंगालमधील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्यावर टीका केली. अनेक भाजपातेर मुख्यमंत्री या स्नेहभोजनापासून लांब राहिले असताना ममता बॅनर्जी यांना दिल्लीत जाण्याची काय गरज भासली? असा प्रश्न उपस्थित करून चौधरी यांनी बॅनर्जी यांच्यावर नाराजी व्यक्त केली.