गडचिरोली : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच राज्यात विविध राजकीय पक्षांनी आणि इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अशात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोली या दोन विधानसभा मतदारससंघांत निवडणूक लढवण्यासाठी तब्बल दहा डॉक्टर इच्छुक असून त्यांनी तयारी सुरू केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील शहरी आणि दुर्गम भागात सार्वजनिक आरोग्याचे विदारक चित्र राज्यासाठी नवे नाही. कधी अपुरी वैद्यकीय सुविधा तर कधी डॉक्टरांची रिक्त पदे यामुळे आदिवासींना कायम अडचणींचा सामना करावा लागतो. असे असताना राज्यात कुठे नव्हे ते गडचिरोली जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेले तब्बल १० डॉक्टर वैद्यकीय क्षेत्र बाजूला ठेवून विधानसभेच्या आखाड्यात उतरल्याचे चित्र आहे. यामध्ये गडचिरोली विधानसभेचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. चंदा कोडवते, डॉ. नितीन कोडवते हे पाच डॉक्टर भाजपाकडून इच्छुक असून डॉ. सोनल कोवे आणि नुकतेच निवृत्त झालेले शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते काँग्रेससकडून इच्छुक असल्याची माहिती आहे.आरमोरी विधानसभेतून डॉ. आशीष कोरेटी, डॉ. मेघा सावसागडे, डॉ. शीलू चिमुरकर हे तिघेही काँग्रेसकडून इच्छुक आहेत. मागील काही महिन्यांपासून हे सर्व इच्छुक डॉक्टर उमेदवार आपल्या क्षेत्रामध्ये दौरे, बैठका घेताना दिसून येत आहे.
हेही वाचा…आधी कर्जफेड, मग शेतकऱ्यांची देणी; सरकारचा सहकारी साखर कारखान्यांसाठी फतवा
समाजमाध्यमांवर चर्चा
यावर समाज माध्यमावर नागरिकांमध्ये दोन मतप्रवाह असून काहींनी या इच्छुक डॉक्टरांचे समर्थन केले आहे. तर काहींनी डॉक्टरांच्या निर्णयावर टीका करीत वैद्यकीय सेवा देण्याचे सल्ले दिले आहे. यापैकी विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी आणि नुकतेच भाजपवासी झालेले माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी हे दोघे अनुभवी नेते आहेत. पण सक्रिय राजकारणात आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे योगदान हा संशोधनाचा विषय आहे. तर इच्छुकांमध्ये भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे आणि काँग्रेसचे डॉ. आशिष कोरेटी हे मागील काही वर्षांपासून विद्यार्थी, सामाजिक चळवळीत सक्रिय आहे.
“राजकारणाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात अधिक भरीव योगदान देण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. मी आदिवासी विध्यार्थी संघटनेच्या माध्यमातून गेल्या दोन दशकापासून सक्रिय आहे. यादरम्यान कित्येक आरोग्य शिबिर घेऊन लोकांना वैद्यकीय सेवा दिली आहे. त्यामुळे समाजाशी जुळलेल्या डॉक्टरांनी राजकारणात यायला पाहिजे.” – डॉ. आशीष कोरेटी, काँग्रेस इच्छुक, उमेदवार, आरमोरी
हेही वाचा…कारण राजकारण: तिवसा मतदारसंघात ‘यशा’साठी भाजपची पराकाष्ठा
“डॉक्टर जरी असलो तरी, संविधानाने प्रत्येकाला निवडणूक लढण्याचे अधिकार दिले आहे. गेल्या दशकात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना आम्हाला आमच्या वैद्यकीय शिक्षणाचा खुप उपयोग झाला.” – डॉ. मिलिंद नरोटे, भाजप इच्छुक, गडचिरोली