गडचिरोली : आत्राम राजघराण्याचे वर्चस्व असलेल्या अहेरी विधानसभेच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. यावरून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मंत्री धर्मरावबाबा आत्राम तर भाजपाकडून माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष बघायला मिळत आहे. तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटकडून मंत्री आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी प्रचार देखील सुरु केला आहे. मात्र, काँग्रेस ही जागा सोडायला तयार नसल्याने इच्छुक उमेदवारांची चांगलीच कोंडी झाल्याचे चित्र आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अहेरीतील उमेदवारी शेवटच्या क्षणाला जाहीर करण्यात आली होती. बदललेल्या राजकीय समीकरणामुळे यंदाही पुन्हा तशीच पारिस्थिती निर्माण झाली आहे. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांविरोधात बंड करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे यावेळी आत्राम राजघराण्यातील तीन उमेदवार एकमेकांविरोधात उभे राहतील. महायुतीकडून मंत्री आत्राम यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याने भाजपचे अम्ब्रीशराव आत्राम यांची बंडखोरी अटळ मानली जात आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेणार याकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून या जागेवर दावा करण्यात आला आहे. मंत्री आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी प्रचाराला देखील सुरवात केली आहे. परंतु या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी हनमंतू मडावीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत या जागेवरून जोरदार खडाजंगी होऊ शकते. सोबतच इच्छुक उमेदवारांच्या नाराजीचे आव्हान देखील राहणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीपुढे अहेरीच्या उमेदवारीवरून मोठी अडचण निर्माण झाल्याचे एकंदरीत चित्र आहे.

हेही वाचा: परभणीत ‘खान हवा की बाण’चे संदर्भ बदलले !

अम्ब्रीश आत्राम यांच्या भूमिकेकडे लक्ष

महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी दिल्यास भाजपचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम हे उभे राहतील असे त्यांनी स्वतःच जाहीर केले आहे. त्यामुळे ते एनवेळेवर दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करू शकतात. भाजप नेतृत्वाकडून त्यांना सध्या तरी सबुरीचा सल्ला देण्यात आलेला आहे. मात्र, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद गटाच्या संपर्कात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.