संजीवनी सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अटकेची भीती असल्याने गजेंद्रसिंह यांनी केंद्र सरकारकडून सुरक्षा घेतली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला होता. दरम्यान, या आरोपांवर आता मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा – राज्यसभेत गोंधळ घालणं पडलं महागात; १२ खासदारांना हक्कभंगाची नोटीस
काय म्हणाले गजेंद्रसिंह शेखावत?
मुख्यमंत्री अशोक गेहलोत माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करत आहेत. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. माझ्या विरोधात तपासयंत्रणांचा वापर सुरू आहे. यापूर्वीही त्यांनी असा प्रयत्न केला होता, अशी प्रतिक्रिया गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली.
संजीवनी सहकारी पतसंस्था मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थानसह इतर अनेक राज्यांमध्ये काम करते. यासंस्थेची नोंदणी झाली, त्यावेळी राजस्थान आणि दिल्लीत काँग्रेसचे सरकार होते. २०१३ मध्ये या संस्थेला मल्टीस्टेटचा दर्जाही मिळाला. तेव्हाही दिल्लीत काँग्रेसचे सरकार होते, असेही ते म्हणाले.
२०१८ साली पतसंस्थेचे संचालक आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपीने काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. २३ ऑगस्ट २०१९ रोजी या पतसंस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. याप्रकरणी डिसेंबर २०१९, फेब्रुवारी २०२० आणि फेब्रुवारी २०२३ अशी तीन आरोपपत्र दाखल करण्यात आली. मात्र, या आरोपत्रांमध्ये माझं किंवा माझ्या कुटुंबियांचं नावं नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री जाहीर खोट बोलत असून गेल्या निवडणुकीत त्यांच्या मुलाचा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
गेहलोत यांचे गजेंद्रसिंह शेखावतांवर आरोप
दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री गेहलोत जोथपूर दौऱ्यावर असताना संजीवनी सहकारी पतसंस्था घोटाळ्यातील पीडितांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मंत्री गजेंद्र सिंग यांनी या घोटाळ्याबाबत भूमिका स्पष्ट करायला हवी. त्यांनी हे सांगायला हवं की या संस्थेत त्यांची काय भूमिका आहे. या घोटाळ्यात अनेक गरीब कुटुंबांचे पैसे बुडाले आहे, असं ते म्हणाले होते.