कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व कोणाचे यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आकड्यांचा खेळ रंगात आला आहे. अमित शहा यांनी पश्चिम महाराष्ट्रात सद्यस्थितीपेक्षा दुप्पट झेप घेऊ असा दावा केला आहे. तर काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी येथे महाविकास आघाडीचेच प्रभुत्व कायम राहून ५८ पैकी ४५ जागा मिळतील असा प्रतिदावा केला आहे. हा मुद्दा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी खोडून काढत महायुतीला ४७ जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बड्या नेत्यांचे दौरेही वाढले आहेत. भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी बैठकीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कोल्हापूर दौरा झाला. त्यांनी विधानसभा निवडणुकी जिंकण्यासाठी कोणती पावले पदाधिकाऱ्यांनी उचलणे गरजेचे आहे याविषयीचा कानमंत्र दिला. ठाकरे सेना – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नाराज कार्यकर्ते फोडून घेण्यावर भर देण्याचा सल्ला शहा यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्रात भाजप हाच सर्वात मोठा पक्ष आहे. आपण ठरवले तर ७० टक्के आमदार महायुतीसाठी या भागातून देऊ शकतो. १७ जागा आपल्याकडे आहेत; त्या आगामी विधानसभा निवडणुकीत दुप्पट म्हणजे ३५ इतक्या करू शकतो. पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचा गड असल्याचे दाखवून देऊ, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
पश्चिम महाराष्ट्र जिंकण्याचा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडी कडून तो खोडण्याचा प्रयत्न झाला. पश्चिम महाराष्ट्रातील ५८ पैकी ४५ हून अधिक जागा जिंकणार आहोत. या भागात महाविकास आघाडी सगळ्यात भक्कम दिसेल, अशी खात्री कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला होता. या पक्षाकडे पुन्हा मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळेच महायुतीतून महा विकास आघाडीत अनेक जण प्रवेश करताना दिसतील, असाही दावा त्यांनी केला आहे.
सतेज पाटील यांच्या भूमिकेवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका केली. निवडणुकीनंतर सतेज पाटील यांचा भ्रमनिरास होईल त्यांना मंत्रिपद मिळाला नसल्याचे दुःख आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. राज्यात महायुतीला यश मिळेल. जागावाटपाबाबत अमित शहा यांच्या सोबत बैठक झाली असून इच्छुक कामाला लागले आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्षांना सन्मानपूर्वक जागा दिल्या जाणार असल्याने वाद राहिला नसल्याचे मुश्रीफ म्हणाले. एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रात आमचाच झेंडा असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीकडून केला जात असला तरी मतदारांचा नेमका कल कसा राहतो याकडे लक्ष वेधलेले आहे.