महेश सरलष्कर

राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडवण्यासाठी जयपूरला गेलेले सोनिया गांधी यांचे दोन्ही दूत कामगिरी फत्ते न करताच सोमवारी दिल्लीत परत आल्याने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाविरोधात अप्रत्यक्ष ‘बंड’ केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गांधी घराणे अडचणीत आले असून त्यांची पक्षावरील पकड ढिली होऊ लागली आहे, असे मानले जात आहे.

हेही वाचा >>> गुलाम नबी आझाद यांचा नवीन पक्ष कितपत प्रभावी ठरेल ?

काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष पदासाठी अशोक गेहलोत यांना सोनिया व राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे झालेल्या सविस्तर चर्चेमध्ये गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यास कडाडून विरोध केला. ‘माझ्याकडे पक्षाध्यक्ष व मुख्यमंत्री अशी दोन्ही पदे द्या किंवा माझ्या निष्ठावानांकडे मुख्यमंत्रीपद सोपवा’, अशी अट गेहलोत यांनी घातली होती. ‘सचिन पायलट यांनी माझे सरकार पाडण्याचा कट केला होता, सचिन गद्दार असून कोणत्याही परिस्थितीत पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री होऊ देणार नाही’, असेही गेहलोत यांनी गांधी कुटुंबातील सदस्यांना सांगितले होते. पण, ‘सचिन पायलट यांना मिळालेली शिक्षा आता पुरे झाली, आता त्यांना मुख्यमंत्री केले पाहिजे’, अशी भूमिका प्रियंका गांधी-वाड्रा यांनी घेतल्याचे समजते.

हेही वाचा >>> भाजपाने केले शिंदे गटाच्या मंत्र्याला लक्ष्य !

गेहलोत यांच्याकडे दोन्ही पदे देण्यासंदर्भात गांधी कुटुंबामध्ये मतभेद असल्याचे सांगितले जाते. गेहलोत यांनी उदयपूर चिंतन शिबिरातील ठरावाचे पालन करून फक्त पक्षाध्यक्ष पद स्वीकारावे, असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. सोनियांनी आपली भूमिका उघड केलेली नाही. तर, प्रियंका यांनी सचिन पायलट यांच्या बाजूने कौल दिला आहे! गांधी कुटुंबातील सदस्य आपल्या पाठीशी उभे राहात नसल्याचे दिसू लागल्यामुळे अशोक गेहलोत यांनी समर्थक आमदारांना राजीनाम्याचे अस्त्र काढण्याचा ‘आदेश’ दिला. गेहलोतसमर्थक सुमारे ९० आमदारांनी उघडपणे सचिन पायलट यांना विरोध केला असून या विरोधाकडे ‘गेहलोत यांचे गांधी कुटुंबाविरोधात केलेले अप्रत्यक्ष बंड’ असे पाहिले जात आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता गांधी कुटुंबाचेही ऐकले जात नाही, असेच चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा >>> शशी थरूरांचे ठरले, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, अनेकांचा पाठिंबा असल्याचा दावा

राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा पेच सोडवण्यासाठी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे व अजय माखन यांना जयपूरला पाठवून काँग्रेसच्या आमदारांचे वैयक्तिक मत जाणून घेण्यास सांगितले होते. मात्र, रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री निवासातील पूर्वनियोजित बैठकीला हे आमदार फिरकले नाहीत. विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी ऐनवेळी बैठकीचे ठिकाण बदलून अन्यत्र गेहलोत समर्थक आमदारांची बैठक घेतली. या आमदारांनी विधानसभाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे राजीनामे देऊन काँग्रेस सरकारला अस्थिर केले व गांधी कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. गेहलोत यांचे निष्ठावान शांती धारिवाल, सी. पी. जोशी आणि प्रतापसिंह खाचरियावास या तिघांनी सोनियांचे दूत खरगे व माकन यांच्याकडे तीन महत्त्वाचे प्रस्ताव ठेवले. त्यापैकी, गेहलोत निष्ठावान आमदारांपैकी एकाकडे मुख्यमंत्रीपद दिले जावे, काँग्रेस पक्षाध्यक्षपदाची निवडणूक झाल्यावर नव्या पक्षाध्यक्षाने मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घ्यावा, या दोन प्रस्तावांचा आग्रह धरण्यात आला. पण, हे प्रस्ताव खरगे व माकन यांनी फेटाळले व फोल झालेल्या राजस्थान मोहिमेचा अहवाल सोनिया गांधींना दिल्लीत आल्यानंतर लगेचच ‘दहा जनपथ’ या निवास्थानी जाऊन सादर केला.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री पुत्रामुळे चव्हाणांचे ठाण्याचे पालकमंत्री पद हुकले ?

पक्षाध्यक्ष पदासाठी गेहलोतांना विरोध?
काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना काढण्यात आलेली असली तरी अजूनही कोणीही उमेदवारी अर्ज भरलेला नाही. अशोक गेहलोत व शशी थरूर यांच्यामध्ये पक्षाध्यक्ष पदासाठी लढत होईल असे चित्र आत्तापर्यंत निर्माण झाले होते. पण, रविवारी दिवसभर गेहलोत निष्ठावानांकडून झालेल्या ‘बंडा’च्या हालचालींमुळे गेहलोत यांच्या पक्षाध्यक्ष पदाच्या उमेदवारीला काँग्रेस कार्यकारिणीतील सदस्यांकडून विरोध होऊ लागला आहे. गेहलोत यांच्याऐवजी कमलनाथ यांच्या नावाची चर्चा सोमवारी केली जात होती. राजस्थानमधील पेचप्रसंग सोडवण्यासाठी सोनिया गांधी यांच्या आदेशावरून कमलनाथही सोमवारी दिल्लीत दाखल झाले. संघटना महासचिवही केरळहून ‘भारत जोडो’ यात्रा सोडून दिल्लीला परत रवाना झाले.गेहलोत व पायलट यांच्यामध्ये कमलनाथ यांना मध्यस्थी करण्यास सांगितले जाऊ शकते. तरीही सत्तासंघर्षाचा पेच सुटला नाही तर मात्र, गांधी कुटुंबाचा पाठिंबा असलेला पक्षाध्यक्ष पदाचा उमेदवार बदलला जाऊ शकतो, अशीही चर्चा केली जाऊ लागली आहे. पक्षाध्यक्ष पदासाठी ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. गेहलोत यांच्या नावावर पूर्णपणे फुली मारली गेली नसली तरी, कमलनाथ, दिग्विजय सिंह आदी ज्येष्ठ नेत्यांचा गांधी कुटुंबाकडून विचार केला जाऊ शकतो, असे मानले जाते.

हेही वाचा >>> इंडियन नॅशनल लोक दलाच्या सभेदरम्यान घडली एक गमतीदार घटना

गांधी कुटुंबाला धक्का!
गेहलोत यांना पक्षाध्यक्ष पदासाठी सोनिया गांधी यांनीच पाठिंबा दिल्यामुळे राजस्थानमधील सत्ताबदल कोणत्याही संघर्षाविना होईल असे गांधी निष्ठावानांना वाटत होते. मात्र, गेहलोत यांनी गांधी कुटुंबासमोर नमते घेण्यास नकार दिल्यामुळे गांधी कुटुंबाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे चित्र सोमवारी निर्माण झाले. गेहलोत यांनी गांधी कुटुंबाला मोठा धक्का दिला असून पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली तरी, गेहलोत गांधी कुटुंबाच्या परोक्ष स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात, हे लक्षात घेऊन गांधी निष्ठावानांकडून आगामी रणनिती आखली जाऊ शकते अशी चर्चा होत आहे.

Story img Loader