मुंबई: नवी मुंबईतील भूखंड वाटपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर गेल्या आठवड्यात विधानसभेत आरोप करणारे भाजपचे आमदार गणेश नाईक यांना या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी चर्चेसाठी बोलाविले होते. पण सामंत वेळेत न पोहचल्याने तसेच कामकाज संपताच परस्पर निघून गेल्याने नाईकांना सुमारे अडीच तास तिष्ठत बसावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १३ महिन्यांपूर्वी आदेश दिल्यानंतरही सिडको नवी मुंबई पालिकेला सामाजिक सेवेचे काही भूखंड हस्तांतरित करीत नाही. सिडको मोक्याचे भूखंड विकासकांना विकून मोकळी झाली आहे, असे काही गंभीर आरोप गणेश नाईक यांनी विधानसभेत केले होते.

हेही वाचा >>> अजित पवार आमदारांसह सिद्धिविनायक चरणी

नाईक यांचा सारा रोख हा मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या विकासकावर होता. नाईक यांचा संताप बघून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्याबरोबर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता सामंत यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. त्यासाठी नवी मुंबई पालिका व सिडकोचे काही अधिकारी उपस्थित होते. नाईक या बैठकीसाठी पावणे अकरा वाजता उपस्थित होते. पण सामंत या बैठकीला वेळेत आले नाहीत. दुपारी एकनंतर सामंत हे विधानसभेत आले. सभागृहाचे कामकाज स्थगित होताच सामंत परस्पर निघून गेले. यामुळे गणेश नाईक चांगलेच संतप्त झाले.

राग अनावर, पण संयम

पावसात अडकल्याने सामंत हे विलंबाने पोहचल्याचे सांगण्यात आले. मला ताटकळत ठेवल्याने प्रचंड राग आला होता. पण मुंबईतील एकूण परिस्थिती लक्षात घेता मी संयम पाळला. मला उद्या या विषयावर निर्णय अपेक्षित असल्याचे नाईक यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh naik waiting for about two and a half hours to meet cm eknath shinde print politics news zws
Show comments