परभणी : महायुतीपासून फारकत घेत राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सुखावले खरे पण या मतदारसंघात भाजपचा उमेदवार रिंगणात असणार नाही हेही आता स्पष्ट झाले आहे. रासपसाठी सहाय्यभूत ठरण्याची भूमिका या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वाने घेतली आहे. आमदार रत्नाकर गुट्टे हेच आता महायुती पुरस्कृत उमेदवार राहणार आहेत त्यामुळे भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मात्र गोची झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार. महायुतीत सामील होणार नाही असे रासपच्या नेतृत्वाने जाहीर केल्यानंतर रासपच्या या निर्णयाचे स्वागत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. या मतदारसंघात रत्नाकर गुट्टे हे रासपचे आमदार आहेत. गुट्टे यांनी या मतदारसंघात भाजपची मुस्कटदाबी केल्याचा आरोपही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेकवेळा केला. रासप जर स्वतंत्र लढणार असेल तर मग भाजपला या मतदारसंघात मार्ग मोकळा राहील असे भाजपच्या काही इच्छुकांना वाटले. यानुसार अनेक दावेदारांनी निवडणूक लढवण्याची इच्छाही प्रदर्शित केली. रासपच्या तावडीतून हा मतदारसंघ मोकळा करा अशी मागणी यापूर्वी या मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली होती. स्वाभाविकच आता रासप महायुतीत असल्याने भाजपला या मतदारसंघात स्वतंत्रपणे लढता येईल अशी खूणगाठ मनाशी बांधून दावेदारांचे प्रयत्नही सुरू झाले पण या मतदारसंघात भाजप लढणार नसून आता गुट्टे हेच महायुतीचे उमेदवार असतील असे संकेत मिळाल्याने भाजपमधील इच्छुकांची गोची झाली.

हेही वाचा – धुळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का

‘रासप’साठी भाजपने या मतदारसंघात आपले पाऊल मागे घेतले आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासाठी हा मतदारसंघ महायुतीने मोकळा केला आहे. या मतदारसंघातून गुट्टे हेच भाजपचे उमेदवार राहतील अशी अटकळ काहींनी बांधली तथापि भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास गुट्टे हे तयार नाहीत. त्यांना मिळणारी दलित, मुस्लिम मते कमळाच्या चिन्हावर मिळणार नाहीत. त्यामुळे गुट्टे हे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाहीत आणि ते रासपचे उमेदवार असले तरी या मतदारसंघात ‘कमळ’या चिन्हाचा उमेदवार असणार नाही.

हेही वाचा – आर्णी व उमरखेडमध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना डच्चू; रिपाईं (आ)चेही स्वप्न भंगले

महायुतीत आता केवळ जिंतूरची एकमेव जागा भाजप लढवत आहे. या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांना अपेक्षेपमाणे उमेदवारी जाहीर झाली मात्र गेल्या निवडणुकीत पाथरी मतदारसंघात दुसऱ्या स्थानी असलेल्या भाजपला इथेही आपल्या महत्त्वाकांक्षेला आवर घालावा लागला आहे. महायुतीत पाथरी मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तर परभणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाला आहे. आता गंगाखेडमध्येही भाजप रिंगणात असणार नाही. त्यामुळे एकमेव जिंतूरच्या जागेवरच भाजपला जिल्ह्यात समाधान मानावे लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangakhed assembly constituency ratnakar gutte in parbhani maharashtra assembly election 2024 print politics news ssb