सर्वच राजकीय पक्षांना आता २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्षाने आपापल्या पातळीवर तयारीदेखील सुरू केली आहे. दुसरीकडे भाजपाला पराभूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधक एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी २३ जून रोजी पाटण्यात पहिली बैठक पार पडली आहे. येत्या १८-१८ जुलै रोजी विरोधकांची बंगळुरू येथे दुसरी बैठक होणार आहे. असे असतानाच भाजपानेदेखील १८ जुलै रोजी दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक आयोजित केली असून या बैठकीला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील(एनडीए) सर्व घटकपक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एनडीएमध्ये नव्याने सामील झालेल्या पक्षांनादेखील यावेळी आमंत्रण पाठवण्यात आले आहे.
१८ जुलै रोजी भाजपाने बोलावली एनडीएची बैठक
मिळालेल्या माहितीनुसार १८ जुलै रोजी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीवर विचार विनियम केला जाणार आहे. आतापर्यंत १९ पक्षांनी आम्ही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. या सर्वच पक्षांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्र पाठवले असून बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे बंडखोरी करून वेगळे झालेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या गटालादेखील एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्याची पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. यासह जितन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा या पक्षालाही बैठकीला आमंत्रण पाठवण्यात आले आहे.
बैठकीत अधिवेशनावर चर्चा केली जाणार नाही
या बैठकीच्या दोन दिवसांनंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे. मात्र या बैठकीमध्ये अधिवेशनातील रणनीती आणि कार्यक्रमावर चर्चा केली जाणार नाही. त्याऐवजी २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र नोदी बैठकीला उपस्थित राहणार
या बैठकीला जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून एनडीए शक्तीप्रदर्शन करणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक आयोजित करण्यात येत आहे.
या बैठकीला कोणकोणत्या पक्षांना आमंत्रण?
या बैठकीला एनडीएतील जवळजवळ सर्वच पक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट), चिराग पासवान यांचा एलजेपी (राम विलास), उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पार्टी, संजय निशाद यांचा निशाद पार्टी, अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल (सोनेलाल), हरियाणातील जेजेपी, आंध्र प्रदेशमधील पवन कल्याण यांच्या जनसेना, तमिळनाडूमधील एआयएडीएमके, तमिळ मानिला काँग्रेस, इंडिया मक्काल कालवी मुन्नेत्रा काझगम, ऑल झारखंड स्टुडंड यूनियन (एजेएसयू), कोनरा संगमा यांच्या एनसीपी, नागालँडमधील एनडीपीपी, सिक्किम राज्यातील एसकेएफ, मिझो नॅशनल फ्रंट, आसाम राज्यातील एजीपी आदी पक्षांना आमंत्रण पाठवण्यात आलेले आहे.
काही पक्षांना बैठकीचे आमंत्रण नाही
या बैठकीसाठी पूर्वी एनडीएचा भाग राहिलेल्या काही पक्षांना आमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. तसेच सध्या एनडीएचा भाग असलेल्या काही पक्षांनादेखील आमंत्रण पाठवण्यात आलेले नाही. यामध्ये सोहेलदेव भारतीय समाज पार्टी, चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी, सुखबीर बादल यांचा शिरोमणी अकाली दल, या पक्षांचा समावेश आहे. शिरोमणी अकाली दल, टीडीपी पक्ष हे यापूर्वी एनडीएचा भाग होते. टीडीपी आणि शिरोमणी अकाली दलातील नेत्यांनी आम्हाला या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी औपचारिक आमंत्रण आलेले नाही, असे सांगितले आहे.