आगामी लोकसभा निवडणूक वर्षभरावर आलेली असताना देशील राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ही निवडणूक समोर ठेवूनच राजकीय पक्ष डावपेच आखत आहेत. भाजपा संपूर्ण भारतात हिंदुत्वाचा झेंडा हातात घेऊन मते मागतो. मात्र केरळमध्ये या पक्षाकडून धर्माने मुस्लीम तसेच ख्रिश्चन मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. गुड फ्रायडेनिमित्त भाजपाने आपल्या कार्यर्त्यांना ख्रिश्चन मतदारांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले होते. तर आता ईदच्या निमित्ताने भाजपा मुस्लीम मतदारांकडे जाणार आहे.
केरळच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया
केरळमध्ये भाजपाने गुड फ्रायडेच्या निमित्ताने ख्रिश्चन धर्मगुरूंची भेट घेतली. या काळात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या समाजाच्या काही लोकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. भाजपाच्या या कार्यक्रमामुळे केरळच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी भाजपावर सडकून टीका केली.
हेही वाचा >> Karnataka Election 2023 : तिकीट न मिळाल्यामुळे अनेक नेत्यांमध्ये असंतोष; भाजपा बंडाळी कशी रोखणार?
पक्षातर्फे शुभेच्छा देण्याचे कार्यकर्त्यांना निर्देश
केरळ भाजपाचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी तेथील भाजपा कार्यकर्त्यांना ईदच्या निमित्ताने मुस्लीम समाजाच्या लोकांची भेट घेऊन त्यांना पक्षातर्फे शुभेच्छा देण्याचे निर्देश दिले आहेत. कोची येथे बुधवारी भाजपाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत वरील निर्देश देण्यात आले आहेत.
आम्हाला चांगले यश मिळाले- प्रकाश जावडेकर
याबबत जावडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकांना एकत्र करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी याआधी ख्रिश्चन लोकांची भेट घेतलेली आहे. तसेच या लोकांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश त्यांनी या लोकांना दिला आहे. या मोहिमेत आम्हाला चांगले यश मिळाले,” असे जावडेकर म्हणाले.
हेही वाचा >> अरविंद केजरीवाल राजकारणातले ‘नटवरलाल’, भ्रष्ट लालूप्रसाद यादव, राहुल गांधींवर भाजपा नेत्याची टीका
काँग्रेस आणि डाव्या पक्षांची भाजपाच्या मोहिमेवर टीका
ख्रिश्चन समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने राबवलेल्या मोहिमेवर भाजपा तसेच डाव्या पक्षांनी सडकून टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अगोदर, ख्रिश्चनांसह अल्पसंख्याक आणि कम्युनिष्ट म्हणजे देशांतर्गत असलेला धोका, असे जाहीर केलेले आहे, अशी टीका केली. तसेच उत्तर भारतात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून चर्चेसवर हल्ले झालेले आहेत, असे म्हणत काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी भाजपाच्या या मोहिमेवर टीका केली आहे. तर अल्पसंख्याकांची मते मिळणार नाहीत, या भीतीपोटी काँग्रेस आणि सीपीआय (मार्क्सवादी) भाजपावर टीका करत आहे, असे प्रत्युत्तर भाजपाने दिले आहे.
ख्रिश्चन धर्मगुरूंमध्ये वेगवेगळे मतप्रवाह
दरम्यान, भाजपाच्या या भूमिकेनंतर केरळमधील ख्रिश्चन धर्मगुरूंमध्ये वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले आहेत. काही धर्मगुरूंनी भाजपाच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. भाजपा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अगोदरच्या भूमिकेवरून भाजपाला विरोध करणे योग्य नाही असे काहींचे मत आहे, तर काही धर्मगुरूंनी भाजपाच्या या भूमिकेला विरोध केला आहे.