२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भाजपाने ही निवडणूक जिंकण्यासाठी आतापासून तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमित शाह यांनी हरियाणामध्ये एका सभेला संबोधित केले. विशेष म्हणजे भाजपा या निवडणुकीत सर्वच्या सर्व म्हणजे १० जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे सूतोवाच अमित शाह यांनी या सभेमध्ये दिले.
भाजपा आणि जेजेपी पक्षांत तीव्र मतभेद?
सिरसा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेला अमित शाह संबोधित करत होते. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वात हरियाणात विकास झाल्याचा दावा केला. तसेच मनोहरलाल खट्टर यांनी खेळाडू, शेतकरी, सैनिकांच्या कल्याणासाठी शक्य होईल ते सर्वकाही केले, असा दावाही शाह यांनी व्यक्त केला. हरियाणामध्ये भाजपाची सध्या जननायक जनता पार्टीशी युती आहे. मात्र त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार उभे केले जातील, असे संकेत दिले आहेत. मागील काही दिवसांपासून भाजपा आणि जेजेपी पक्षांत मतभेद तीव्र झाले आहेत. असे असतानाच अमित शाह यांनी दिलेल्या संकेतांना महत्त्व आले आहे. दुसरीकडे जेजेपी पक्षाचे सर्वेसर्वा दुष्यंत चौटाला यांनी आम्ही लोकसभेच्या सर्व जागा लढवणार आहोत, असे याआधीच जाहीर केलेले आहे. त्यासाठी येत्या २ जुलै रोजी जेजेपी पक्ष सोनीपत येथून प्रचाराला सुरुवात करणार आहे.
हेही वाचा >> मणिपूरमधील बिरेन सिंह यांचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; मिझोरमच्या खासदाराची मागणी
भाजपाचा ताकद दाखवण्याचा प्रयत्न
अमित शाह यांनी सिरसा येथील सभेच्या माध्यमातून भाजपाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या सभेदरम्यान मंचावर अमित शाह यांच्यासह मनोहरलाल खट्टर तसेच भाजपाचे अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये रानिया मतदारसंघातील अपक्ष आमदार रंजित सिंह हेदेखील उपस्थित होते. रंजित सिंह हे दुष्यंत चौटाला यांचे नातेवाईक आहेत. सध्या रंजित सिंह हे खट्टर सरकारमध्ये उर्जामंत्री आहेत. ही सभा संपल्यानंतर अमित शाह रंजित सिंह यांच्या निवासस्थानी गेले. येथे शाह आणि रंजित यांच्यात बैठक पार पडली.
हरियाणामधील लोकांनीच भारत मातेचे संरक्षण केले- अमित शाह
सिरसा येथे अमित शाह यांनी साधारण २० मिनिटे भाषण केले. या भाषणात त्यांनी दुष्यंत चौटाला यांचा उल्लेख केला नाही. तसेच भाषणात त्यांनी खेळाडू, शेतकरी, सैनिकांचा गौरव केला. “जेव्हा देशावर संकट आलेले असते, तेव्हा हरियाणा देश सर्वांत पुढे असतो. हरियाणामधील लोकांनी नेहमीच पुढे होऊन भारत मातेचे संरक्षण केलेले आहे. जीवन आणि रक्त देऊन हरियाणातील लोकांनी देशाला वाचलेले आहे. जेव्हा-जेव्हा मी हरियाणामध्ये येतो तेव्हा-तेव्हा मला या गोष्टीची आवर्जुन आठवण होते,” असे अमित शाह म्हणाले.
हेही वाचा >> जमाखर्च: संजय राठोड,अन्न व औषध प्रशासन मंत्री; वाद अधिक, कामे कमी
मनोहरलाल खट्टर यांनी खेळाडूंसाठी शक्य ते सर्वकाही केले
“हरियाणा हे खेळाडूंचे राज्य आहे. देशाला मिळालेल्या प्रत्येकी तीन पदकांपैकी एक पदक हे हरियाणा राज्यातील खेळाडूंना मिळालेले असते. हरियाणामध्ये खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा मी खेळाडूंसाठी जे काही करणे शक्य आहे ते सर्व करा, असे मनोहरलाल खट्टर यांना सांगितले होते. विशेष म्हणजे मनोहरलाल खट्टर यांनीदेखील खेळाडूंसाठी शक्य ते सर्वकाही केले. मला येथील शेतकऱ्यांचेही आभार मानायचे आहेत. पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी संपूर्ण देशाला धान्य पुरवतात,” असे अमित शाह म्हणाले.
“आतापर्यं दोन वेळा तुमच्यामुळेच मोदी यांचा विजय झालेला आहे. हरियाणामधील जनतेने येथील सर्वच्या सर्व म्हणजेच १० जागांवर भाजपाच्या उमेदवारांना निवडून दिलेले आहे. यावेळीदेखील हरियाणामध्ये सर्व १० जागांवर भाजपाचाच विजय होईल, याचा मला विश्वास आहे,” असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >> समाजवादी पार्टीने कंबर कसली, लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात!
काँग्रेसच्या काळात हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार -अमित शाह
यासह अमित शाह यांनी याधीच्या भूपेंदरसिंह हुडा यांच्या सरकारवर टीका केली. “हुडा यांचे ३D सरकार होते. म्हणजेच दरबारी, दामाद आणि डिलर की सरकार असे त्यांचे सरकार होते. मनोहरलाल यांनी या तिन्ही गोष्टी हद्दपार करून टाकल्या, असे अमित शाह म्हणाले. तसेच २००५ ते २०१४ या काळात काँग्रेसची सत्ता असताना हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचाही त्यांनी आरोप केला. अगोदरचे मुख्यमंत्री हे फक्त रोहतकपर्यंतच सीमित असायचे. मनोहरलाल खट्टर हे पहिले मुख्यमंत्री आहेत जे संपूर्ण हरियाणाचे आहेत. येथे भाजपाचे सरकार आल्यानंतर हरियाणामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात आली,” असा दावाही शाह यांनी केला.
मनोहरलाल खट्टर आणि भूपेंदरसिंह हुडा यांच्या सरकारची केली तुलना
शाह यांनी मनोहरलाल खट्टर आणि भूपेंदरसिंह हुडा यांच्या सरकारची तुलना केली. खट्टर यांचे सरकार पायाभूत सुविधा, शेतकरी कल्याण अशा सर्वच क्षेत्रात सरस आहे. खट्टर यांच्या सरकारच्या काळात पिकांना योग्य भाव देण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना मिळणारी मदत थेट त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात आली, असा दावा अमित शाह यांनी केला.
हेही वाचा >> आंबेडकर, पेरियार वाचा, फेक न्यूजपासून सावध रहा; तमिळ सुपरस्टार विजयचा विद्यार्थ्यांना संदेश
अमित शाह यांची राहुल गांधींवर टीका
अमित शाह यांनी त्यांच्या भाषणात कलम ३७० चाही उल्लेख केला. काँग्रेसने कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध केला, असे अमित शाह म्हणाले. “कलम ३७० रद्द का करू नये हे मला राहुल गांधी यांनी सांगावे. ३७० कलम रद्द केले तर काश्मीरमध्ये रक्तपात होईल, असे राहुल गांधी म्हणाले होते. मात्र आम्ही कलम ३७० रद्द करून दाखवले. जम्मू आणि काश्मीरमध्ये मात्र कोठेही रक्ताचा थेंबही सांडला नाही,” असे म्हणत शाह यांनी राहुल गांधींवर टीका केली.