आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. मात्र अद्याप विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. पश्चिम बंगाल, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांत जागावाटपाचे नेमके सूत्र अद्याप ठरू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचे असलेल्या उत्तर प्रदेश या राज्यात तर परिस्थिती फारच बिकट झाली आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यातील जागावाटपावर तोडगा निघत नसल्यामुळे समाजवादी पार्टीशी युती केलेल्या राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) पक्षामध्ये सस्वस्थता निर्माण झाली आहे.
आरएलडीच्या नेत्यांमध्ये चिंता
गेल्या काही दिवसांपासून आरएलडी आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांत जागावाटपावर चर्चा चालू होती. १९ जानेवारी रोजी या दोन्ही पक्षांतील चर्चा यशस्वी ठरली आणि समाजवादी पार्टीने आरएलडीला लोकसभा निवडणुकीसाठी एकूण सात जागा देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव या दोन्ही नेत्यांनी या युतीची घोषणा केली. आरएलडीला सात जागा देण्याचे ठरलेले असले तरी या सात जागा कोणत्या असतील हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याच कारणामुळे निवडणुकीच्या शर्यतीत असणाऱ्या आरएलडीच्या नेत्यांना तयारीला लागावे की नाही? याबाबत स्पष्ट आदेश मिळालेले नाही. परिणामी या नेत्यांमध्ये सध्यातरी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
हेही वाचा – ‘भारत जोडो यात्रेचं आमंत्रणच नाही,’ अखिलेश यादव यांच्या विधानानंतर काँग्रेसचे स्पष्टीकरण
आरएलडीला निवडणुकीची तयारी करण्यास अडचण
काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांत जागावाटपावर चर्चा चालू असल्यामुळे नेमक्या कोणत्या जागा आरएलडीला द्यायच्या, यावर समाजवादी पार्टी आणि आरएलडी यांच्यात एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे आरएलडीला निवडणुकीची तयारी करण्यास अडचण येत आहे. लवकरात लवकर जागावाटप व्हावे असा आग्रह आरएलडीकडून केला जात आहे.
“…तर आरएलडी समाजवादी पार्टीच्या बाजूने”
समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाचे अंतिम सूत्र ठरलेले नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांत युती होणार की नाही? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. यावर आरएलडीच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली. “काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात काय होईल, याचा विचार न करता आम्ही आमची समाजवादी पार्टीसोबतची युती कायम ठेवू. कारण उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला जनाधार नाही. त्यामुळे समाजवादी पार्टीशी युती करणे हे आमच्यासाठी फायद्याचे आहे. आरएलडीला कोणत्या जागा मिळणार, हे जाहीर करण्यास जयंत चौधरी आणि अखिलेश यादव यांनी मनाई केलेली आहे. यामुळे आमच्या काही नेत्यांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे,” असे या नेत्याने म्हटले.
“काही जागांवर एकमत झाले”
तर आरएलडीच्या आणखी एका नेत्याने जागावाटपावर भाष्य करताना काही जागांवर आमच्यात एकमत झाले आहे, असे सांगितले. “बाघपत आणि मथुरा हे दोन मतदारसंघ आमच्या वाट्याला येतील, याचा आम्हाला विश्वास आहे. मिरट, मुझफ्फरनगर, नगिना, आग्रा, हाथरस या जागाही आम्हाला मिळतील अशी आम्हाला आशा आहे. याच परिस्थितीमुळे आमच्या उमेदवारांमध्ये धाकधूक आहे,” असे या नेत्याने सांगितले.
हेही वाचा – बिहारमध्ये सत्तापालट, आता महाराष्ट्राकडे लक्ष? भाजपाची नेमकी रणनीती काय?
समाजवादी पार्टीने जाहीर केली पहिली यादी
दरम्यान दुसरीकडे काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यातील जागावाटपाच्या चर्चेतून अद्याप तोडगा निघालेला नाही. एकीकडे ही चर्चा चालू असताना दुसरीकडे समाजवादी पार्टीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण १६ उमेदवारांची नावे आहेत. तर आम्ही काँग्रेसला ११ जागा देऊ असे समाजवादी पार्टीने एकतर्फी निर्णय घेऊन टाकलेला आहे. यामुळेदेखील या दोन्ही पक्षांतील चर्चेला अंतिम स्वरुप मिळालेले नाही. समाजवादी पार्टीने १६ उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
“…तर आम्ही दुसरा पर्याया शोधू”
समाजवादी पार्टीच्या या निर्णयानंतर गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी समाजवादी पार्टीला सूचक इशारा दिला आहे. काँग्रेस इतर पक्षांना सहकार्य करायला तयार आहे. मात्र आम्ही लाचार आहोत, असा समज कोणीही करून घेऊ नये. असे असेल तर आम्ही अन्य पर्यायाचा विचार करू, असे पांडे म्हणाले. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही पक्षांत युती होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
समाजवादी पार्टी-आरएलडी युतीचा इतिहास काय?
दरम्यान, समाजवादी पार्टी आणि आरएलडी या दोन्ही पक्षांची २०१९ सालच्या निवडणुकीपासून युती आहे. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत आरएलडी पक्षाने महायुतीचा भाग म्हणून एकूण तीन जागा लढवल्या होत्या. या महायुतीत बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीचा या पक्षांचा समावेश होता. समाजवादी पार्टीने एकूण ३७ जागा लढवल्या होत्या. यातील पाच जागांवर समाजवादी पार्टीचा विजय झाला होता. तर २०२२ सालच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी-आरएलडी युतीने एकूण १२० जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीने समाजवादी पार्टीने ३४७ जागा लढवत १११ जागा जिंकल्या होत्या. तर आरएलडीने ३३ जागा लढवून नऊ जागांवर विजय मिळवला होता.