आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरील पक्ष कामाला लागले आहेत. नरेंद्र मोदी तसेच भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक राष्ट्रीय पातळीवर महाआघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्यातरी या मोहिमेचे सारथ्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार करत आहेत. विरोधकांना एकत्र आणण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावत असून यामागे त्यांच्याही काही महत्त्वाकांक्षा आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितीश कुमार यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांची नव्याने भेट

११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमधील अधिकाऱ्यांची बदली आणि नियुक्ती करण्याचे अधिकार दिल्ली सरकारचे आहेत, असा निर्णय देत केंद्र सरकारला धक्का दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर केंद्र सरकारने अध्यादेश जारी करत दिल्लीमधील अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि बदलीसाठी राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरणाची स्थापना केली. यासह याबाबतचा अंतिम निर्णय नायब राज्यपालांचा असेल अशीही यात तरतूद करण्यात आली. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर नितीश कुमार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. तसेच मोदी सरकारने जारी केलेल्या या अध्यादेशाला विरोध करत विरोधकांचा केजरीवाल यांना संपूर्ण पाठिंबा आहे, असे सांगितले. मोदी सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाला विरोध करत नितीश कुमार विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा >> धुळे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा

विरोधकांच्या आघाडीत नितीश कुमार यांचे काय स्थान?

७२ वर्षीय नितीश कुमार विरोधकांना एकत्र आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांमागे नितीश कुमार यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याची महत्त्वाकांक्षा असल्याचे म्हटले जात आहे. मात्र हा दावा खुद्द नितीश कुमार यांनी फेटाळून लावलेला आहे. सध्यातरी मी फक्त विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याची माझी कोणतीही इच्छा नाही, असे नितीश कुमार सांगतात. मात्र नितीश कुमार यांची पंतप्रधान होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयामुळे आगमी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधकांचे नेतृत्व करण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी नितीश कुमार बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकत्र येणार का? तसेच विरोधक एकत्र आलेच तर यामध्ये नितीश कुमार यांचे काय स्थान असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >> केंद्र सरकारच्या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी केजरीवाल ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरेंना पुन्हा भेटणार

नितीश कुमार यांनी सोमवारी (२२ मे) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुन्हा एकदा भेट घेतली. या भेटीत त्यांनी विरोधकांच्या ऐक्यावर नव्याने चर्चा केली. याआधी त्यांनी देशभरातील महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे. या भेटसत्रांदरम्यान नितीश कुमार यांच्या सोबत बिहारचे उपमुख्यमंत्री तसेच आरजेडी पक्षाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव हेदेखील होते. आतापर्यंत त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे.

नितीश कुमार यांनी आतापर्यंत घेतली अनेक नेत्यांची भेट

या भेटसत्रांनंतर विरोधकांच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. अगोदर तृणमूल काँग्रेस आणि आप पक्ष काँग्रेसला थेट विरोध करायचे. आगामी लोकसभा निवडणुकीत या पक्षांची ‘एकला चलो रे’ची भूमिका होती. आता मात्र हे पक्ष काँग्रेससह इतर विरोधी पक्षांशी चर्चा करण्याबाबत सकारात्मक आहेत. नितीश कुमार यांना या मोहिमेत काही प्रमाणात यश आल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी मात्र नितीश कुमार यांना नकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नितीश कुमार यांनी भूवनेश्वर येथे जाऊन ओडिशाचे मुख्यमंत्री तथा बीजेडी पक्षाचे सर्वेसर्वा नवीन पटनाईक यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर पटनाईक यांनी काँग्रेस तसेच भाजपापासून समान अंतरावर राहणेच पसंत केले आहे. नितीश कुमार आतापर्यंत तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा बीआरएस पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखर राव तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तथा वायएसआरसीपी पक्षाचे प्रमुख वायएस जगनमोहन रेड्डी यांची भेट घेऊ शकलेले नाहीत. केसीआर यांच्या राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून स्वत:च्या काही महत्त्वाकांक्षा आहेत. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीत अन्य नेत्याला पाठिंबा देतील का? असा प्रश्न उपस्थित होतो.

हेही वाचा >> Karnataka : पाच वर्षे सिद्धरामय्याच मुख्यमंत्री, एमबी पाटील यांचा दावा; सत्तास्थापनेनंतर सिद्धरामय्या गटाकडून प्रतिक्रिया

नितीश कुमार यांना कोठे सकारात्मक तर कोठे नकारात्मक प्रतिसाद

नितीश कुमार विरोधकांना एकत्र आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. त्यांना या मोहिमेत कोठे सकारात्मक तर काही ठिकाणी नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधक एकत्र आल्यानंतरच नितीश कुमार यांच्या या प्रयत्नांना यश आले, असे म्हणावे लागेल. दक्षिण भारतातील गैरभाजपा नेत्यांना एकत्र आणण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. यामध्ये जगनमोहन रेड्डी आणि केसीआर हे दोन प्रमुख नेते आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री तथा डीएमकेचे प्रमुख एमके स्टॅलिन हे अगोदरपासूनच काँग्रेसच्या सोबत आहेत.

जागावाटपावरून विरोधी पक्षांचा काँग्रेससोबत वाद होण्याची शक्यता?

विरोधकांना एकत्र करण्यासह आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या विजयासाठी नितीश कुमार प्रयत्न करत आहेत. विरोधकांची आघाडी झालीच तर मतांचे विभाजन टाळण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराविरोधात विरोधकांचा फक्त एकच उमेदवार कसा उभा राहील यासाठी नितीश कुमार प्रयत्नशील आहेत. मात्र याच मुद्द्यावरून काँग्रेससोबत अनेक विरोधी पक्षांचा वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना विरोधकांना एकत्र आणण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. तसेच त्यांना या मोहिमेत किती यश मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: General election 2024 nitish kumar importance opposition party alliance including congress tmc brs aap ncp prd