२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी ‘इंडिया’ नावाने नव्या आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून एकूण २६ पक्ष एकत्र आले आहेत. हे पक्ष एकत्र आले असले तरी, त्यांच्यात जागावाटपाचे सूत्र अद्याप ठरलेले नाही. आघाडीच्या संयोजक पदावरूनही या पक्षांत बराच खल सुरू आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या आघाडीसाठी खूप प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांच्याच गळ्यात संयोजकपदाची माळ पडणार का? असे विचारले जात आहे. यावरच आता खुद्द नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मला काहीही नको, मी फक्त…”
विरोधकांना एकत्र आणण्यासाठी नितीश कुमार यांनी मुख्य भूमिका बजावलेली आहे. त्यांनी वेगवेगळ्या राज्यांतील प्रमुख विरोधी पक्षांच्या प्रमुखांची भेट घेतलेली आहे. या प्रयत्नांमागे त्यांची पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ते संयोजकपदासाठी इच्छुक असल्याचाही दावा केला जातोय. त्यावरच आता नितीश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी सुरुवातीपासूनच सांगतोय की माझी कोणतीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाहीये. मला काहीही नको. आघाडीचे संयोजकपद अन्य कोणालातरी दिले जावे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, आमच्या आघाडीत जास्तीत जास्त पक्षांचा समावेश असावा. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत,” असे नितीश कुमार म्हणाले.
लवकरच आणखी काही पक्षांचा विरोधकांच्या आघाडीत समावेश
भविष्यात इंडिया या आघाडीत अनेक पक्ष सामील होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. “लवकरच आमची मुंबईमध्ये एक बैठक आहे. आम्ही सर्वच पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहोत. या बैठकीत आम्ही आम्ही आमचा अजेंडा निश्चित करणार आहेत. तसेच या बैठकीत अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भविष्यात आणखी काही पक्ष आमच्या आघाडीत सामील होणार आहेत. या बैठकीत आम्ही त्या पक्षांची नावे जाहीर करू,” अशी माहिती नितीश कुमार यांनी दिली.
तिसरी बैठक मुंबईत, महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा
दरम्यान, विरोधकांच्या या आघाडीत एकूण २६ पक्षांचा समावेश आहे. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी हे सर्व पक्ष एकत्र आले आहेत. या आघाडीला मूर्त स्वरुप यावे यासाठी सर्वांत अगोदर २३ जून रोजी पाटण्यात पहिली बैठक पार पडली होती. त्यानंतर १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरू येथे दुसरी बैठक झाली होती. आता तिसरी बैठक ही मुंबईत ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या बैठकीत जागावाटपाचेही सूत्र ठरण्याची शक्यता आहे.