या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने आपले बहुमत गमावले आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला एनडीएतील इतर घटक पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. या निवडणुकीत भाजपाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नसली तरीही भाजपासाठी काही सुखद व आश्चर्यकारक अशा गोष्टीही घडल्या आहेत. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे केरळमध्ये भाजपाला आपले खाते उघडता आले आहे. भाजपा दक्षिणेतील राज्यांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून करत आहे. मात्र, त्याला ते आजवर शक्य झालेले नाही. विशेषत: केरळ राज्यामध्ये आजवर कधीही भाजपाला आपले खाते उघडता आलेले नव्हते. मात्र, या निवडणुकीत भाजपाला केरळच्या २० पैकी एका जागेवर विजय मिळवता आला आहे. दुसरीकडे केरळमधील भाजपाचा ख्रिश्चन चेहरा म्हणून ओळखले जाणारे जॉर्ज कुरियन यांनाही आश्चर्यकारकपणे एनडीएच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
कोण आहेत जॉर्ज कुरियन?
जॉर्ज कुरियन यांनी यापूर्वी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. जॉर्ज कुरियन (वय ६३) हे कोट्टायमचे रहिवासी असून, ते सध्या भाजपा केरळचे उपाध्यक्ष आहेत. पेशाने वकील असलेले जॉर्ज कुरियन वृत्तवाहिन्यांवरील चर्चेमध्ये सातत्याने सहभागी असतात. त्यामुळे ते परवलीचा चेहरा आहेत. केरळ राज्यात जेव्हा प्रचारसभा असतात वा सार्वजनिक कार्यक्रम असतात, तेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भाषणांचे भाषांतर करण्यासाठी तेच उभे राहतात. ख्रिश्चन समुदायाशी अधिक जवळीक साधण्यासाठीच भाजपाने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याचे बोलले जाते.
ख्रिश्चन मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न
कुरियन हे केरळमधील सायरो-मलबार कॅथॉलिक चर्चशी संबंधित आहेत. हे चर्च केरळमधील सर्वांत प्रमुख ख्रिश्चन चर्चपैकी एक आहे. केरळमध्ये निवडून आलेले भाजपाचे एकमेव उमेदवार सुरेश गोपी यांच्या विजयामागे ख्रिश्चन मतदारांचाही हात असल्याचे सांगितले जाते. विशेषत: त्रिशूर मतदारसंघातील कॅथॉलिकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. भाजपाच्या स्थापनेपासूनच म्हणजेच जवळपास १९८० पासूनच जॉर्ज कुरियन भाजपासोबत राहिले आहेत. केरळमधील भाजपामध्ये नेतृत्वपद मिळण्यापूर्वी त्यांनी प्रदेश सरचिटणीस आणि भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव म्हणूनही काम केले आहे. ते केरळमध्ये पक्षाचे अधिकृत प्रवक्तेही राहिले आहेत.
पक्षस्थापनेपासूनच सोबत
त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. भाजपाने ख्रिश्चन मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न अलीकडे सुरू केला आहे. भाजपाच्या दृष्टिक्षेपात ख्रिश्चन मतदार नव्हते; तेव्हापासूनच कुरियन यांनी केरळमध्ये संघ परिवारासोबत जुळवून घेत, आपला राजकीय प्रवास सुरू केला होता. त्याचे फळ त्यांना आता मंत्रिपदाच्या निमित्ताने मिळत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते पी. के. कृष्णदास यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, “कुरियन यांचा मंत्रिमंडळात समावेश होणे ही राज्यासाठी मोठी गोष्ट आहे. आता केरळकडे दोन मंत्रिपदे आहेत. नरेंद्र मोदी यांनी राज्याचा योग्य विचार केल्याचे यातून दिसून येत आहे.”
‘लव्ह जिहाद’बाबत व्यक्त केली होती चिंता
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष असताना कुरियन यांनी ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केरळमधील ख्रिश्चन समुदायाबाबत चिंताही व्यक्त केली होती. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुरियन यांनी भाजपाच्या तिकिटावर पुथुपल्ली येथून तत्कालीन मुख्यमंत्री व काँग्रेसचे उमेदवार ओमन चंडी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. ते या निवडणुकीत पराभूत झाले होते. १९९९ ते २००४ या काळातील वाजपेयी सरकारमध्ये ओ. राजगोपाल केंद्रीय मंत्री होते. तेव्हा जॉर्ज कुरियन यांनी त्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून काम पाहिले होते. पंतप्रधान मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये अल्फोन्स कन्नन्थनम यांना पर्यटन राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. कन्नन्थनम हे राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून गेले होते.
हेही वाचा : लोहिया ते अखिलेश व्हाया मुलायम! उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी राजकारणाचा प्रवास कसा झालाय?
भाजपाची केरळमधील कामगिरी
या लोकसभा निवडणुकीमध्ये केरळ राज्यात भाजपला १६ टक्क्यांवर मते मिळाली. तसेच विधानसभेच्या ११ मतदारसंघांेेत आघाडी मिळाली आहे. पक्षाच्या दृष्टीने ही सकारात्मक चिन्हे आहेत. केरळमध्ये भाजपाला पक्षवाढीसाठी संधी असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवरच भाजपाने आपल्या मंत्रिमंडळात केरळमधील दोघांचा समावेश केला आहे. केरळमध्ये साधारण १८ टक्के ख्रिश्चन आहेत. यावेळी काही ख्रिश्चन मते भाजपला मिळाल्याची चर्चा आहे.