काँग्रेसचे बंडखोर नेते गुलाम नबी आझाद यांच्या ‘आझाद’ या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना काँग्रेसवर कडाडून टीका केली. राहुल गांधी यांच्यामुळेच मला काँग्रेसमधून बाहेर पडावे लागले, असे सांगताना आझाद म्हणाले की, काँग्रेसमध्ये आता कणाहीन लोकच राहू शकतात. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना आझाद म्हणाले की, मी एकटाच काँग्रेसमधून बाहेर पडलेला व्यक्ती नाही. माझ्यासारखे अनेक नेते, युवा आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत जे काँग्रेसमधून बाहेर पडले. एकदा का तुम्ही काँग्रेसमध्ये राहिलात की, तुमच्याकडे कणा राहत नाही. त्यांच्या आदेशानुसार तुम्हाला वागावे लागते. आझाद यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ‘डेमॉक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी’ नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यूपीए-२ च्या काळात राहुल गांधी यांनी जेव्हा काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा अध्यादेश फाडून टाकला, तेव्हाच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यावर प्रतिक्रिया देऊन त्या कृतीचा विरोध करायला हवा होता. त्या वेळी राहुल गांधी यांच्याविरोधात कोणतीही कारवाई न केल्यामुळे यूपीएचे मंत्रिमंडळ कमकुवत असल्याची टीका आझाद यांनी केली. आझाद त्या वेळी मंत्रिमंडळात सामील होते, हे विशेष. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आझाद म्हणाले की, जर राहुल गांधी यांनी २०१३ साली यूपीए सरकारने काढलेला अध्यादेश फाडला नसता तर आज त्यांचे निलंबन झाले नसते. आम्हाला माहीत होते की, दुसरा पक्ष सत्तेत आल्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्याचा आमच्याविरोधात वापर करू शकतो. मात्र राहुल गांधी यांनी सदर अध्यादेशाला फालतू म्हटले आणि तो फाडून टाकला.

हे वाचा >> “काँग्रेसपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप चांगले”; राहुल गांधींवर टीका करताना गुलाम नबी आझाद म्हणाले, “काँग्रेस पुन्हा सत्तेत…”

आझाद आणि काँग्रेस यांचे पाच दशकांचे नाते होते. मात्र पक्षांतर्गत मतभेदानंतर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. आत्मचरित्राच्या प्रकाशना वेळी त्यांनी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांवरदेखील टीका केली. ते म्हणाले, जे लोक ट्विटरवर सक्रिय आहेत, त्यांच्यापेक्षा मी दोन हजार टक्के अधिक काँग्रेसी आहे. मी २४ कॅरेट खात्रीशीर काँग्रेसी आहे. काँग्रेसमधील इतर नेते १८ कॅरेटदेखील काँग्रेसी नाहीत.

राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये सामील होण्यास सांगितले तर काय कराल? असा प्रश्न विचारला असता आझाद म्हणाले की, त्यांना आमच्यासारखी माणसे नको आहेत. त्यांना फक्त ट्विटरवर सक्रिय असणाऱ्या नेत्यांची आवश्यकता आहे, जे भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसला ५०० जागा मिळतील अशा बाता मारतात.

जर सोनिया गांधी यांनी तुम्हाला पक्षात बोलावले तर काय कराल? असाही प्रश्न आझाद यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, सोनिया गांधी यांच्या हातात काही असते तर आम्ही पक्षाच्या बाहेरच पडलो नसतो. गुलाम नबी आझाद यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये आनंद शर्मा, जनार्दन द्विवेदी, तसेच विरोधी पक्षातील खासदार आणि केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित होते.

दरम्यान काँग्रेसने मात्र गुलाम नबी आझाद यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी आझाद यांच्यावर टीका करताना म्हटले, “ज्या विचारधारेला आझाद यांनी ५० वर्षे विरोध केला, त्याच विचारधारेचे आता ते समर्थन करत आहेत. एकेकाळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी देव असणारे आझाद आता मातीच्या मूर्तीपुरतेही देव राहिलेले नाहीत. ज्या पक्षाने खूप काही दिले, त्याच पक्षाकडे आता ते बोट दाखवत आहेत. जर एखादा नेता ५० वर्षे पक्षात घालवल्यानंतरही दगा देत असेल, तर पक्ष आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर कसा विश्वास ठेवेल? मागच्या दोन दिवसांपासून ते स्वतः ला ‘आझाद’ म्हणवून घेत आहेत, पण ते खरेतर ‘गुलाम’ झाले आहेत.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghulam nabi azad blames rahul gandhi for exit says once you are in congress you are spineless kvg