डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे बंडखोर नेते गुलाम नबी आझाद गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर तुटून पडत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांनी जहाल स्वरूपातील टीका केली आहे. भाजपाच्या टीकेला जोरकसपणे उत्तर देणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची आझाद यांच्या आरोपांमुळे कोंडी होताना दिसत आहे. काल (दि.१० एप्रिल) आझाद यांनी राहुल गांधींवर एक नवा आरोप केला. राहुल गांधी परदेशात जाऊन अनिष्ट व्यवसाय करणाऱ्या उद्योगपतींच्या भेटीगाठी घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून भारतीय उद्योगपती गौतम अदाणी यांच्याविरोधात आघाडी उघडल्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांच्या आरोपांमुळे काँग्रेसला मागे रेटण्याची आयती संधी भाजपाला मिळाली. यासंबंधी राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपाने केली आहे. तर काँग्रेस पक्षाने आझाद यांचे दावे खोडून काढताना त्यांची टीका दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी ट्विट करून गुलाम नबी आझाद यांच्यासह इतर बंडखोर काँग्रेस नेत्यांना अदाणी प्रकरणात ओढून त्यांच्यावर टीका केली. शरद पवार एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, गौतम अदाणी यांना लक्ष्य केले जात आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी (८ एप्रिल) हे ट्विट केले आहे. “अदाणी यांच्या बेनामी कंपनीतील ते २० हजार कोटी रुपये कुणाचे?”, असा प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी यांनी इंग्रजीतील Adani या शब्दाची फोड करून दिली आहे. या ट्विटसोबत जोडलेल्या एका फोटोत त्यांनी A म्हणजे गुलाम (नबी आझाद), D म्हणजे (ज्योतिरादित्य) सिंधिया, A म्हणजे किरण (रेड्डी), N म्हणजे हिमंता (बिस्वा सरमा) आणि I म्हणजे अनिल (अँटोनी) असल्याचे प्रतीत केले आहे.

राहुल गांधी यांच्या ट्विटबद्दल आझाद यांनी मल्याळम वृत्तवाहिनी एशियानेटवर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “मी माझ्या आयुष्यात कोणत्याही उद्योगपतीसोबत संबंध प्रस्थापित केलेले नाहीत. मात्र त्या कुटुंबाचे (गांधी) आणि त्यांचे (राहुल) अनेक उद्योगपतींशी संबंध आहेत. मला त्या कुटुंबाबद्दल आदर आहे, त्यामुळे अधिक बोलणार नाही. माझ्याकडे खूप उदाहरणे आहेत. ते (राहुल गांधी) परदेशात जाऊन कुणाला भेटत होते याचे अनेक दाखले मी देऊ शकतो. ते पदेशात अनिष्ट व्यापार करणाऱ्या उद्योगपतींना भेटत होते.”

हे वाचा >> काँग्रेसमध्ये फक्त कणाहीनच राहू शकतात; गुलाम नबी आझादांचा राहुल गांधींवर घणाघात

आझाद यांच्याकडून आरोप होताच भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींनी या आरोपांवर उत्तर द्यावे, अशी मागणी केली. “गुलाम नबी आझाद यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. राहुल गांधी परदेशात जाऊन कोणत्या उद्योगपतींना भेटत होते. ते उद्योगपती कोण आहेत? त्यांचा अनिष्ट व्यवसाय काय आहे? भारतविरोधी व्यावसायिकांना मदत करून राहुल गांधी भारताला कमकुवत करण्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काम करण्याचा प्रयत्न करत आहेत का?”, असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला. रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, राहुल गांधी यांनी आजवर काँग्रेस नेत्यांच्या अनेक भ्रष्टचार प्रकरणांवर सोयीस्कर मौन बाळगले आहे. त्यानंतर आता आझाद यांच्यावतीने करण्यात आलेले आरोप गंभीर असून राहुल गांधी यांनी त्यावर उत्तर दिले पाहिजे.

हे ही वाचा >> “काँग्रेसपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप चांगले”; राहुल गांधींवर टीका करताना गुलाम नबी आझाद म्हणाले, “काँग्रेस पुन्हा सत्तेत…”

राहुल गांधी यांनी ८ एप्रिल रोजी केलेल्या ट्विटला एकेकाळी त्यांचे सहकारी असलेल्या आणि भाजपावासी झालेल्या ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटमधूनच प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, “तुम्ही एका ट्रोलरपुरते मर्यादित झाला आहात, हे आता स्पष्ट होते. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून मुख्य मुद्दा भरकटविण्यापेक्षा माझ्या तीन प्रश्नांची उत्तरे द्या?” असे सांगून त्यांनी ओबीसींच्या अवमानावर माफी का नाही मागत, न्यायालयाकडे बोट का दाखविता आणि तुमच्यासाठी वेगळे कायदे आहेत का? असे तीन प्रश्न विचारले. तसेच तुम्हाला एवढा अहंकार झाला आहात की, हे प्रश्नदेखील तुमच्या समजण्यापलीकडे आहेत, असा टोलाही अखेरच्या ट्विटमध्ये लगावला आहे.

भाजपाच्या या आरोपांवर काँग्रेसचे संवाद विभागाचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश यांनी नेहमीप्रमाणे उत्तर दिले आहे. “श्री. मोदी यांच्याप्रति आपली निष्ठा दाखविण्यासाठी गुलाम नबी आझाद प्रत्येक दिवसागणिक खालची पातळी गाठत आहेत. आझाद यांचे ताजे आरोप हे त्यांच्या नैराश्याचे प्रतिबिंब आहे. मी एवढेच म्हणेन, हे खूपच दुर्दैवी आहे.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghulam nabi azad says rahul gandhi meets undesirable businessman on his foreign tour bjp asked question what is that business kvg