दीपक महाले
जळगाव – राज्यातील भाजपचे संकटमोचक अशी प्रतिमा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, यामुळे शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना स्थान मिळणे यात विशेष असे काहीच नाही. किंबहुना नवीन सरकारमध्ये त्यांना कोणते मंत्रीपद मिळणार, याचेच विशेष कुतूहल जळगावकरांना आहे.
जामनेर मतदारसंघाचे आतापर्यंत सहावेळा प्रतिनिधित्व करणारे गिरीश महाजन यांचा महाविद्यालयीन काळातच अभाविपच्या माध्यमातून महाविद्यालयीन प्रतिनिधीपासून सुरु झालेला राजकीय प्रवास पुढे जामनेरचे सरपंच, आमदार, मंत्री असा बहरतच गेला. जामनेर येथे मराठी गुर्जर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९९५ मध्ये त्यांनी भाजपतर्फे पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. माजी आमदार ईश्वरलाल जैन यांना पराभूत करण्याची किमया साधली. महाजन यांना सुरेशदादा जैन यांनीही मोठी मदत केली होती. महाजन यांनीही अनेकदा सार्वजनिकरीत्या ते मान्य केले आहे. तेव्हापासून आतापर्यंत ते सातत्याने जामनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. २०१४ मध्ये युती सत्तेत आल्यावर त्यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांत भाजपच्या राजकीय रणनीतिमध्ये महाजन यांच्या अनेक चालींना यश मिळत गेले. विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांना गळाला लावण्यात ते यशस्वी ठरत गेले.
तत्कालीन भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून एकनाथ खडसे यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु, फडणवीस यांच्याशी खडसे यांचे खटके उडू लागल्यानंतर या वादाचा महाजन यांना फायदा झाला. जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, नाशिक आणि नंदुरबारचे पालकमंत्री अशी त्यांच्या जबाबदारीत वाढच होत गेली. जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये खडसे विरुध्द महाजन हे दोन गट पडले होते. उत्तर महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या रुपाने भाजपचे वर्चस्व होते; परंतु त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर महाजन यांना जिल्ह्यात भाजपमध्ये कोणी प्रतिस्पर्धीच राहिलेला नाही. महाजन यांच्याकडे एखाद्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली म्हणजे विजय निश्चित, अशी भाजपला खात्री असते. त्यांनी जळगाव महापालिकेतील सुरेशदादा जैन यांच्या चार दशकांच्या सत्तेला हादरे देत महापालिका भाजपच्या ताब्यात आणली होती, तसेच धुळे महापालिकेतही अनिल गोटे, काँग्रेस, राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करुन भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली. नाशिकचे पालकमंत्रीपद सांभाळताना महापालिकेवर भाजपला वर्चस्व मिळवून दिले.
हेही वाचा- वादाच्या रिंगणातील मंत्रीपद
महाजन यांच्या पत्नी साधना महाजन सध्या जामनेरच्या नगराध्यक्ष आहेत. महाजन यांना दोन मुली असून, त्या विवाहित आहेत. राजकारणाशी त्यांचा संबंध नसल्याने महाजन यांना संपूर्ण वेळ राजकारणात देणे शक्य होते. मोकळ्या स्वभावामुळे ते कधी कधी वादातही अडकतात. मंत्री असताना शाळेत जाताना पिस्तूल जवळ ठेवणे, सांगली-कोल्हापुरातील महापुराप्रसंगी बोटीतून जाताना भ्रमणध्वनीत हसरी स्वयंछबी टिपणे, यामुळे त्यांनी वादही ओढवून घेतले. विधानसभेतही राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांच्याशी त्यांची शाब्दिक खडाजंगी झाली होती. महाजन यांनी इशाऱ्यातून धमकी दिल्याचा आरोप पाटील यांनी केला होता. त्यावेळी सभापती हरिभाऊ बागडे यांनी त्यांना समज दिली होती. याशिवाय, त्यापूर्वीच्या सरकारने दिलेला ११०० कोटींचा करार कायम ठेवण्यासाठी शंभर कोटींची लाच एका कंत्राटदाराने देऊ केल्याचा आरोप महाजन यांनी जलसंपदामंत्री म्हणून पदभार स्वीकारताच केला होता. विरोधकांनी त्याचे नाव सांगण्याचा आग्रह धरूनही त्यांनी शेवटपर्यंत ते नाव जाहीर केले नाही.
हेही वाचा- भाजप नेत्यांच्या विरोधावर मात करत राधाकृष्ण विखे मंत्रीपदी!
लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे, जनतेतील सामान्य वावर या महाजन यांच्या जमेच्या बाजू आहेत. कुठे अपघात झाला असेल तर तिथे तत्काळ धावून जाणे, रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणे यामुळे ते कमालीचे लोकप्रिय आहेत. लोकांमध्ये चहाच्या टपरीवर जाऊन बसणे, युवकांच्या कट्ट्यावर जाऊन त्यांच्याशी गप्पा मारणे, कोणत्याही मिरवणुकीत सहभाग घेणे, मिरवणुकीत समरसून नाचणे, लेझीम खेळणे, ढोल वाजविणे, अशा गोष्टी ते करतात. आणि लोकांनाही त्यांचा हा स्वभाव आवडत असल्याने ते या गोष्टी जाणीवपूर्वक करत असतात.