जळगाव – राजकारणात आपले महत्त्व कसे वाढवायचे, हे तंत्र भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुणालाही शिकता येईल. संधीचे सोने करताना राजकीय प्रतिस्पर्ध्यांना गारद करण्याचे त्यांचे कसब वादातीत आहे. या गुणवैशिष्ट्यांमुळे स्वकीयांसह विरोधकांवर मात करीत ते राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण करू शकले. मात्र, ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण या खात्यात मात्र तसा प्रभाव निर्माण करता आलेला नाही. सदैव राजकारणात मग्न असणारे महाजन भिडस्त स्वभावाने कायम वादात अडकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होईपर्यंत भाजपमध्ये स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंत एकनाथ खडसे यांचा दबदबा होता. खडसेंच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी फडणवीस यांनी जळगावात गिरीश महाजनांना ताकद दिली. २०१६ मध्ये खडसेंवर मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचे आरोप झाले. त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांना पायउतार व्हावे लागले. तेव्हापासून महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील राजकारणात जम बसविला. अर्थात फडणवीस यांच्या पाठबळामुळे ते शक्य झाले. खडसेंना गारद करण्याच्या कौशल्यातून महाजन हे फडणवीस यांचे निकटवर्तीय बनले. भाजपच्या वर्तुळात महाजनांचा प्रभाव वाढला. खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात राजकीय खुंटा मजबूत करीत असताना महाजन यांची पक्षाला अधिक गरज भासणार आहे.

हेही वाचा – जमाखर्च : सुधीर मुनगंटीवार; चर्चेतच अधिक

जळगावमध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र यांसह सर्वच अभ्यासक्रमांची महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आहेत. या ठिकाणी वैद्यकीय केंद्र निर्माण करून वैद्यकीय शिक्षणासाठी नवी कवाडे खुली करण्याची घोषणा एप्रिल २०१७ मध्ये करण्यात आली होती. चिंचोली येथील प्रस्तावित वैद्यकीय केंद्राचे काम कासव गतीने सुरू आहे. १२०० ते १४०० कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कधी साकारणार, याबद्दल ठोस उत्तर महाजन यांच्याकडेही नाही. सद्यःस्थितीत आहे त्याच वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. रुग्ण व नातेवाइकांच्या रोषाला रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना कायम सामोरे जावे लागते. काही विभाग अक्षरशः बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पुरता गोंधळ उडत असल्याचे चित्र आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांनी तातडीने मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून महाजन यांनी आपली आरोग्यदूत म्हणून ओळख तयारी केली. वैद्यकीय शिक्षणमंत्री या नात्याने महाजन यांनी आरोग्य समस्यांकडे लक्ष केंद्रित करीत विविध प्रकारची अभियाने राबवीत सर्वांगीण आरोग्य आणि विकासावर भर दिला आहे. वेगवेगळ्या शासकीय रुग्णालयांत ती राबविली जात आहेत. मात्र, तरीही तालुका व उपकेंद्रांवरील ग्रामीण रुग्णव्यवस्था, सोयी-सुविधा, यंत्रसामग्री याबाबत मात्र उदासीनता दिसते. क्रीडा व युवा कल्याणमंत्री या नात्याने स्थानिक खेळाडूंनी देशाचे नाव उज्ज्वल करावे आणि जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी मेहरुण भागात अद्ययावत शासकीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून त्यासाठीच्या भूसंपादन प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. क्रीडा संकुलातील विविध सुविधांमुळे जिल्ह्यातील खेळाडू विविध स्पर्धांत यशस्वी होऊ शकतील, असे मंत्री महाजन सांगतात. पण दोन ते तीन तालुका क्रीडा संकुल वगळता इतर क्रीडा संकुलांची निधीअभावी वाताहत झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – जमाखर्च : दीपक केसरकर; घोषणांचा सुकाळ, पण…

जिल्ह्यातील जलसिंचन योजनांची कामे निधीअभावी रखडली आहेत. कामांची स्थिती व मिळणारा निधी पाहता हे प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण होणार नसल्याची स्थिती आहे, अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी प्रक्रिया प्रकल्पाची निकड पूर्ण झालेली नाही. २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात टेक्स्टाइल पार्कची केलेली घोषणा हवेतच विरली आहे. त्याचा पाठपुरावा करण्यात महाजन कमी पडले. या पार्कच्या उभारणीबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आपल्या खात्यांपेक्षा पक्षातील समस्या सोडविण्याकडे महाजन यांचा अधिक कल राहिला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girish mahajan more involved in politics than his cabinet posts print politics news ssb