Gita Press Awarded Gandhi Peace Prize : केंद्र सरकारने वर्ष २०२१ चा ‘गांधी पीस पुरस्कार’ गोरखपूरमधील गीता प्रेस संस्थेला घोषित केला आहे. त्यानंतर केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये शाब्दिक वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षक असलेल्या पुरस्कार समिती १८ जून रोजी विचारविनिमय करून एकमातने गीता प्रेसला पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते खासदार मनोज कुमार झा यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या टीकेला भाजपामधील अनेक नेत्यांनी उत्तर दिले आहे. माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, विद्यमान मंत्री मिनाक्षी लेखी यांनी गीता प्रेसला दिलेल्या पुरस्काराला पाठिंबा दिला असून काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
गीता प्रेसचे प्रवक्ते आशुतोष उपाध्याय यांनी द प्रिंटशी बोलताना सांगितले की, हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही पंतप्रधानांचे मनापासून आभार मानतो. पण त्यांनी राजकीय टीकेवर उत्तर देणे टाळले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी रविवारी निवेदन जाहीर करून सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील परिक्षक मंडळाने गीता प्रेसला वर्ष २०२१ चा गांधी पीस पुरस्कार देण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. गीता प्रेसने गांधीच्या विचारांप्रमाणेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने कार्य केले आहे.
हे वाचा >> गीता प्रेस – ‘असहिष्णुते’ची पाळेमुळे..
केंद्र सरकारने १९९५ साली महात्मा गांधी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ‘गांधी पीस पुरस्कार’ सुरू केला होता. पुरस्कार जिंकणाऱ्यांना रुपये एक कोटी, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातो. इस्रो, रामकृष्ण मिशन, ग्रामीण बँक ऑफ बांगलादेश, विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी), अक्षया पात्र (बंगळुरु), एकल अभियान ट्रस्ट आणि सुलभ इंटरनॅशनल (नवी दिल्ली) यांना आतापर्यंत पुरस्कार मिळाले आहेत.
गीता प्रेस आणि वाद
केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत टीका केली आहे. “केंद्र सरकारचा निर्णय खेदजनक असून एकप्रकारे त्यांनी सावरकर आणि गोडसेलाच पुरस्कार दिला आहे” जयराम रमेश यांनी अक्षय मुकुल यांच्या “गीता प्रेस अँड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया” या पुस्तकाचा दाखला आपल्या ट्वीटमध्ये दिला आहे. मुकुल यांनी या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, गीता प्रेस आणि तिच्या प्रकाशकांनी मांडलेल्या संकल्पना हिंदू राजकीय चेतना निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. त्यातून एकप्रकारे हिंदू जनजागृतीच झाली.
आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज कुमार झा यांनी म्हटले की, गीता प्रेसचे साहित्यामधील योगदान कुणीही नाकारत नाही. १९२३ पासूनची जगातील सर्वात मोठी हिंदू प्रकाशन संस्था म्हणून गीता प्रेसचा उल्लेख होतो. पण शांततेसाठी त्यांना पुरस्कार देणे योग्य ठरते का? असा प्रश्न झा यांनी उपस्थित केला. “त्यांनी कोणत्या प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तन घडविले? त्यांनी निश्चितच चांगले काम केले, पण शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचे योगदान काय? एखाद्या संस्थेला पुरस्कार देत असताना काहीतरी निकष ठरवायला हवेत. जर तुम्हाला गीता प्रेसचा उद्धार करायचा आहे, तर तुम्ही त्यांना काहीही देऊ शकता, पण गांधींचे नाव जोडण्याची काय गरज आहे”, अशी भूमिका झा यांनी माध्यमांसमोर सोमवारी (दि. १९ जून) मांडली.
राजकीय टीकेला उत्तर देत असताना केंद्रीय परराष्ट्र आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मिनाक्षी लेखी म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष सर्वसमावेशक समाजाची मूलभूत मूल्ये मानन्यास नकार देतो का? तसेच काँग्रेस पक्ष कोणत्या बाजूचा आहे? असाही प्रश्न लेखी यांनी उपस्थित केला. लेखी यांनी सोमवारी (दि. १९ जून) ट्वीट करत म्हटले, गीता प्रेसचे संस्थापक हनुमान प्रसाद पोद्दार हे एक क्रांतिकारी होते, ज्यांना ब्रिटिशांनी अटक केली होती. गोविंद वल्लभ पंत यांनी त्यांना भारत रत्न पुरस्कार मिळावा, अशी मागणी केली होती. तसेच त्यांच्या कल्याण या मासिकामुळे दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी संघर्ष केला. अतिशय वाजवी दरात मिळणाऱ्या गीता प्रेसच्या पुस्तकांनी लोकांचा विश्वास आणि अभिमान अढळ ठेवला.
भाजपाचे आणखी एक वरिष्ठ नेते खासदार मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, जर काँग्रेसच्या हातात असेल तर सर्व पुरस्कार एकाच कुटुंबाच्या ताब्यात जातील. गीता प्रेसच्या योगदानाबाबत माहीत असूनही काँग्रेसचे लोक या निर्णयावर टीका करतात, हे पाहून आश्चर्य वाटते. माजी मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी तर काँग्रेसवर जहाल टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष हा माओवादी विचारसरणीचा आहे.
रवी शंकर प्रसाद एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, “काँग्रेस पक्षाकडून आणखी काही अपेक्षा करता येत नाही. ज्या लोकांनी राम मंदिराच्या निर्माणात अडथळा निर्माण केला. तसेच तिहेरी तलाकचा विरोध केला. अशा पक्षाने गीता प्रेसला गांधी पीस पुरस्कार मिळाल्याच्या टीका करणे, यापेक्षा लज्जास्पद आणखी काही असू शकत नाही. मी काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करतो. तसेच मला खेदाने म्हणावे लागत आहे की, एकेकाळी देशाचे सरकार चालविणारा पक्ष आज माओवादी विचारसरणीचा झाला आहे. अशा मानसिकतेचा देशभरातून विरोध झाला पाहीज”