गेल्या आठवड्यात आठ आमदारांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे गोव्यात काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. एकाच वेळी आठ आमदार सोडून गेल्याने गोवा विधानसभेतील विरोधी पक्ष नावाला उरला आहे. एकूण ४० सदस्यसंख्या असणाऱ्या गोवा विधानसभेत आता विरोधी पक्षात केवळ सात आमदार उरले आहेत. गोवा विधानसभेत भाजपानंतर काँग्रेसकडे सर्वाधिक तीन आमदार आहेत.
त्यामुळे आता गोव्यात विरोधी पक्षनेता हा काँग्रेस पक्षाऐवजी आघाडीतील इतर घटक पक्षाचा असण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून पहिल्यांदाच आमदार झालेले युरी आलेमाओ यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली असली तरी, ते एकटेच विरोधी पक्षाच्या कार्यालयावर दावा करतील असे संकेत दिले नाहीत.
त्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून इतरही नावे शर्यतीत असू शकतात, याबाबतची सूचक प्रतिक्रिया काँग्रेसचे आमदार कार्लोस फरेरा यांनी दिली आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीचे (जीएफपी) अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पुन्हा एकदा काँग्रेससोबत येण्याची गरज आहे. आपण सर्वांनी एकत्रितपणे भाजपासारख्या शक्तींसमोर उभं राहिलं पाहिजे. भाजपाकडून लोकशाहीला पायदळी तुडवण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही फरेरा यांनी केला. त्यामुळे सरदेसाई यांचा सहा वर्षे जुना ‘जीएफपी’ काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा गोव्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा- काश्मीरमध्ये काँग्रेसचा भाजपाला धक्का; लेह-लडाखमधील पोटनिवडणुकीत मोठा विजय
यावर आता विजय सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय वरवरच्या चर्चेच्या माध्यमातून घेता येणार नाही. काँग्रेसकडून कोणताही औपचारिक प्रस्ताव आला नसताना, विलीनीकरणाचा मुद्दा मी पुढे रेटू शकत नाही. यासाठी औपचारिक उच्चस्तरीय पुढाकार आवश्यक आहे. मात्र, हाय कमांडकडून अद्याप याबाबत कोणतीही पावलं उचलली नाहीत,” असं सरदेसाई म्हणाले. पण काँग्रेस आणि जीएफपी नेत्यांमध्ये पुन्हा चर्चा सुरू असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून दिली जात आहे.
खरं तर, मार्चमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरदेसाई यांनी काँग्रेसच्या राज्य युनिटबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसने गोवा विधानसभेत ४० पैकी ३७ जागा लढवल्या होत्या. तर तीन जागा ‘जीएफपी’ला सोडल्या होत्या. त्यातील केवळ फर्तोडा मतदार संघात जीएफपीला विजय साकारता आला. येथे सरदेसाई हेच उमेदवार होते. त्यांच्या पक्षाला फक्त एक जागा जिंकता आली. काँग्रेसनं समतोल प्रमाणात जागांचे वाटप न केल्याचा आरोपही सरदेसाई यांनी केला होता. काँग्रेसचे माजी नेते, सरदेसाई यांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘जीएफपी’ची स्थापना केली होती. या निवडणुकीत सरदेसाई यांच्या जीएफआयला तीन जागा जिंकता आल्या होत्या.
हेही वाचा- VIDEO : कंगना रणौत मथुरेतून लढणार का? हेमा मालिनी म्हणतात, उद्या राखी सावंतही…
कोविड-१९ साथीच्या काळात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारवर विजय सरदेसाई यांनी कठोर टीका केली होती. जुलै महिन्यात पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही त्यांनी अनेक मुद्द्यांवरून सावंत सरकारला कोंडीत पकडले होते.