गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा पुसून टाकल्या जाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करत भाजपा सरकार गोव्याच्या ६० व्या स्वातंत्र्य वर्धापनदिनानिमित्त एक नवी सुरुवात करण्याच्या विचारात असल्याचे सांगतिले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात एक नवा वाद पेटला आहे. विरोधकांनी सावंत यांना याविषयी स्पष्ट भूमिका मांडण्याचे आवाहन केले आहे. भाजपा समाजामध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी विरोधकांनी केला आहे.
भारतीय सैनिकांनी १९६१ रोजी पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करेपर्यंत येथे चारशे वर्ष पोर्तुगीजांनी राज्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्धापन दिनानिमित्त गोव्यातील बेतुल किल्ला येथे मंगळवारी एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला संबोधित करत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, “गोव्याला स्वातंत्र्य मिळून आता ६० वर्ष पूर्ण होत आहेत. याकाळात आपण पोर्तुगीजांच्या खाणाखुणा पुसून टाकायला हव्या होत्या. आपल्याला एक नवी सुरुवात करावी लागणार आहे. आपण भारताच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. आज आपला गोवा कसा आहे आणि ज्यावेळी आपण भारतीय स्वातंत्र्याचा १०० वा वर्धापन दिन साजरा करून, त्यावेळी आपला गोवा कसा असायला हवा, याचा आपण विचार केला पाहीजे.”
हे वाचा >> मार्च महिन्यात गोव्यातील जंगलात वणवे का पेटतात? आग नैसर्गिक की मानवी हस्तक्षेप?
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य विवेकहीन
काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाओ यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात नवीन काहीच नाही. आर्थिक आणि प्रशासकीय अपयशापासून लोकांचे लक्ष भावनिक मुद्द्यांकडे वळविण्याकडे भाजपाचा चांगलाच हातखंडा आहे. मुख्यमंत्र्यांकडून अशी विवेकहीन वक्तव्ये येत आहेत, हे निषेधार्ह आहे. गोव्याला स्वातंत्र्य मिळून ६२ वर्ष झाल्यानंतरही वसाहतवादाचे ढोल पिटले जात आहेत. हे निरर्थक आहे. गोव्यात वसाहतवादाची कोणती निशाणी उरली आहे? वसाहतवादाची खूण असलीच तर ती मुख्यमंत्र्यांच्या वायफळ बडबडीत आणि उजव्या ब्रिगेडच्या विचारसरणीत दिसते. पण गोव्यात मात्र कुठेच दिसत नाही.”
जगभरात इतिहासाच्या चिन्हाचे संवर्धन आणि दस्तऐवजीकरण केले जाते. ऐतिहासिक वारसास्थळे ही आपली मालमत्ता आहे. जर विद्यमान सत्ताधाऱ्यांना एवढेही समजत नसेल तर ही गोव्याची शोकांतिका आहे, अशीही टीका आलेमाओ यांनी केली.
हे ही वाचा >> घरच्यांना न सांगता व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी गोव्यात गेले, प्रेमीयुगुलाचा समुद्रात बुडून मृत्यू
पोर्तुगीजांनी बांधलेल्या जलवाहिन्या मोडणार का?
रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टीचे (Revolutionary Goans Party – RGP) अध्यक्ष मनोज परब म्हणाले की, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत समाजामध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी असे वक्तव्य करत आहेत. “गोव्यातील कोणत्या पोर्तुगीजांच्या खुणा त्यांना खोडून काढायच्या आहेत, हे सावंत यांनी स्पष्ट करावे. त्यांना समान नागरी संहिता, कम्युनिडेड कोड (पोर्तुगीज शब्द – गावांच्या मालकीची जमीन), पोर्तुगीजांनी बांधलेल्या जलवाहिन्या आणि इतर वारसास्थळे मोडून काढायची आहेत का? रस्त्यांना दिलेली पोर्तुगीजांची नावे त्यांना बदलायची आहेत का? गोव्याच्या प्रत्येक गावात तुम्हाला पोर्तुगीज संस्कृतीच्या खाणाखुणा दिसतील. सावंत यांच्याकडून केले गेलेले वक्तव्य हे फक्त गोव्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न आहे”, अशी टीका परब यांनी केली.
पोर्तुगीजांनी मंदिरे उद्ध्वस्त केली
शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यात बोलत असताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पोर्तुगीजांनी आपली मंदिरे उद्ध्वस्त केली. मराठ्यांनी जेव्हा पोर्तुगीजांबरोबर शांततेचा तह केला, तेव्हा कुठे मंदिरांची पडझड थांबली. मागच्यावर्षीच्या अर्थसंकल्पात गोवा सरकारने २० कोटींचा निधी देऊन पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची सुरुवात केली आहे. तसेच पोर्तुगीजांच्या काळात उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल.
आणखी वाचा >> गोव्यामध्ये बिअर इतकी स्वस्त का मिळते? इतर राज्यांच्या तुलनेत एवढा फरक असण्याचे कारण जाणून घ्या
पोर्तुगीज पासपोर्टचे काय करणार?
आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीच्या आधी भाजपा सरकार अशाचप्रकारची विधाने करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करते. पोर्तुगीज पासपोर्टच्या आधारे गोव्यातील अनेक नागरिक युरोपमध्ये चांगल्या संधीच्या शोधात जात असतात, अशावेळी सावंत गोव्यातील कोणत्या गोष्टी पुसून टाकणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोविड काळातील कटू आठवणी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला पाहीजे. त्याकाळात गोवन नागरिकांनी खूप काही सहन केले. तसेच मुख्यमंत्र्यांनी रोजगारासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर बोलावे. रोजगाराचा प्रश्न सोडून इतर प्रश्नाकडे वळू नये, अशीही टीका पालेकर यांनी केली.