काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गोव्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची काँग्रेस कार्यकारिणीच्या (सिडब्लूसी) आजीवन निमंत्रित पदावरून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी कामत आणि काँग्रेसचे आमदार मायकल लोबो यांच्यावर पक्ष विरोधी कारवाई केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी भाजपसोबत कट रचून पक्षाच्या विधिमंडळ शाखेत फूट पाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रविवारी जाहीर केलेल्या निवेदनात, संघटनेचे प्रभारी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी म्हटले आहे की, “माननीय काँग्रेस अध्यक्षांनी श्री दिगंबर कामत यांना काँग्रेस कार्यकारिणीच्या स्थायी निमंत्रित पदावरून तात्काळ हटवण्यात येत आहे”. कामत आणि लोबो यांच्याविरोधात गोवा काँग्रेसने विधानसभेच्या अध्यक्षांसमोर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे दोघांना अपात्र ठरवण्यबाबत याचिका दाखल केली आहे. १० जुलै रोजी राव यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ११ पैकी केवळ पाच काँग्रेस आमदार उपस्थित होते. गोवामध्ये काँग्रेसचे एकूण ११ आमदार आहेत. यापैकी ८ आमदार भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती.
राव यांनी दोन जेष्ठ नेत्यांवर नेत्यांवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला होता. पक्षांतरविरोधी कायद्यापासून बचाव करण्यासाठी पक्षाच्या किमान दोन तृतीयांश आमदारांना दुसर्या विधिमंडळ पक्षात विलीनीकरणासाठी गट स्थापन करणे आवश्यक आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार मुकुल वासनिक यांना हे प्रकरण शांत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून दिल्लीहून गोव्याला रवाना करण्यात आले. लोबो यांच्यासह दहा आमदारांनी वासनिक यांची भेट घेतली, मात्र कामत दूरच राहिले. वासनिक यांच्या भेटीनंतर गोवा कॉंग्रेसवरील संकट सध्यातरी टळल्याचे दिसून आले.
एप्रिलमध्ये कामत यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सर्वात महत्वाची असणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी मागील विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आणि फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी यांच्याकडून राज्यातील सर्व जबाबदाऱ्या काढून घेण्यात आल्या. काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचा नेता न बनवल्याबद्दल कट करून कामत यांनी मार्चपासून गोव्यातील पक्षाच्या हालचालींपासून एक पाऊल मागे घेतले होते.