महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर गोव्यातील काँग्रेस पक्ष बंडखोरी रोखण्यासाठी सजग झाला आहे. कॉंग्रेस समधील बंडखोरीबाबत सुरु असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये सध्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव सध्या गोव्यात तळ ठोकून आहेत. पक्षाचे ११ आमदार काँग्रेससोबतच आहेत हे सांगण्याचा गोवा काँग्रेसचे नेते ठामपणे प्रयत्न करत आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे सुद्धा सक्रिय झाले आहेत. 

पूर्वानुभव लक्षात घेऊन बैठकांचे आयोजन

बरोबर तीन वर्षांपूर्वी कॉंग्रेसच्या दोन तृतियांश आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. गोवा काँग्रेसमध्ये पुन्हा अश्याप्रकारची बंडाळी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र या बंडखोरीच्या बातम्या अफवा असल्याचे सांगत गोवा काँग्रेसने या बाबतच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. गोवा काँग्रेस पुन्हा फुटण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच रविवारी पक्षाने त्यांच्या आमदारांची एक बैठक आयोजित केली होती. एआयसीसीचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी काँग्रेस पक्षाच्या आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीचा रविवार हा दुसरा दिवस होता. शनिवारी काँग्रेसच्या ११ आमदारांनी पणजी येथे राव यांची भेट घेतली होती. या आमदारांनी ते पक्षासोबतच असल्याचे स्पष्टपणे सांगितले. आमदारांनी दिलेल्या आश्वासनामुळे गोव्यात पक्षफुटीच्या बातम्यांना साध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे. 

बैठकीआधी काँग्रेस नेत्यांची चिंता वाढली होती

मात्र रविवारी बैठक सुरू होण्याआधी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दुपारपर्यंत राव यांच्या भेटीसाठी ११ पैकी फक्त तीनच आमदार उपस्थित होते. आठ आमदार आले नसल्यामुळे काँग्रेसची चिंता वाढत होती. बाकीचे आठ आमदार बंडखोरी करणार असल्याच्या बातम्या दिवसभर सुरू होत्या. राजकीय वर्तुळात बंडखोरी होणार असल्याच्या उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अनुपस्थित असलेले आठ आमदार तेच होते ज्यांच्या बंडखोरीची चर्चा सुरू होती. मात्र संध्याकाळपर्यंत उपस्थित आमदारांची संख्या सात झाली होती. हळूहळू ही संख्या वाढत गेली. त्यानंतर सर्व आमदार मडगाव येथील हॉटेलात बैठकीला उपस्थित राहिले. त्याच दिवशी ज्येष्ठ आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचीसुद्धा काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. गोव्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि संभाव्य बंडखोरीच्या चर्चा याबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.

Story img Loader