देशातील सर्वच महत्त्वाच्या पक्षांना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी या पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवरील नेतेदेखील आपापल्या पक्षाकडून तिकीट मिळावे यासाठी आतापासूनच प्रयत्न करत आहेत; तर काही नेते भविष्यकालीन राजकारणाचा विचार करून पक्षबदल करत आहेत. गोव्यामध्येही मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. येथे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ यांनी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार यांच्या गटात सामील होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलेमाओ यांनी घेतली प्रफुल्ल पटेल यांची भेट

चर्चिल आलेमाओ यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयानंतर त्यांनी शुक्रवारी (१८ ऑगस्ट) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची मुंबईत भेट घेतली आहे. या भेटीनंतर चर्चिल आलेमाओ अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रत्येक भेट राजकीय नसते – आलेमाओ

या भेटीबाबत चर्चिल आलेमाओ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली आहे. मात्र, प्रत्येक भेट ही राजकीय नसते. ते फक्त राज्यसभेचे खासदार नसून माझे चांगले मित्र आहेत. आमचे राजकारणाव्यतिरिक्त वैयक्तिक संबंध आहेत. त्यांनी याआधी गोव्यातील फुटबॉलच्या प्रगतीसाठी खूप काही केले आहे. जेव्हा मी त्यांची भेट घेतो, तेव्हा फुटबॉलबद्दल चर्चा करतो” असे चर्चिल आलेमाओ म्हणाले. या भेटीबाबत प्रफुल्ल पटेल यांची ‘इंडियन एक्स्प्रेस’ने प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

जो बोलवेल त्या प्रत्येकालाच भेटायला जाणार – आलेमाओ

चर्चिल आलेमाओ यांना तुम्ही भविष्यात राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असे विचारण्यात आले. मात्र, या प्रश्नाचे त्यांनी थेट उत्तर दिले नाही. “कोणत्या पक्षात सामील व्हावे, हे मी अद्याप ठरवलेले नाही. मी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेतो. या भेटीत आम्ही फक्त राजकारणावरच चर्चा करत नाही. मी जेव्हा एखाद्या पक्षात प्रवेश करण्याचे ठरवेन, तेव्हा याबाबत सविस्तर सांगेन,” असे चर्चिल आलेमाओ म्हणाले. तसेच मी फक्त अजित पवार यांनाच नाही तर शरद पवार, प्रफुल्ल पटेल अशा सर्वांनाच भेटेन. मला जो कॉल करेल, त्या प्रत्येकालाच मी भेटण्यास तयार आहे, असेही चर्चिल आलेमाओ यांनी सांगितले.

तृणमूल काँग्रेसला अनेक नेत्यांची सोडचिठ्ठी

२०२२ साली तृणमूल काँग्रेसने गोव्यात विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत तृणमूलला यश आले नव्हते. याच कारणामुळे निवडणूक पार पडल्यानंतर अनेक नेत्यांनी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. याच वर्षाच्या एप्रिल महिन्यात गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. तसेच तृणमूल काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देण्याची घोषणा केली होती.

आलेमाओ १९९० साली गोव्याचे मुख्यमंत्री

दुसरीकडे चर्चिल आलेमाओ यांचे गोव्यात राजकीय प्रस्थ आहे. ते युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि सेव्ह गोवा फ्रंट या दोन पक्षांचे संस्थापक सदस्य होते. हे दोन्ही पक्ष सध्या सक्रिय नाहीत. ते १९९० साली गोव्याचे मुख्यमंत्री होते. ते कॅथलिक ख्रिश्चन समुदायातून आलेले पहिले मुख्यमंत्री आहेत.

२०२१ साली आम आदमी पार्टीच्या उमेदवाराकडून पराभव

चर्चिल आलेमाओ यांनी आतापर्यंत पाच वेळा आमदारकी भूषवलेली आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेकवेळा पक्षबदल केलेला आहे. २०२१ सालाच्या डिसेंबर महिन्यात त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. २०२२ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत त्यांनी बेनौलिम या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने त्यांना पराभूत केले होते.

पाच वेळा आमदार, दोनदा खासदार

२०१७ साली त्यांनी याच मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकली होती. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. हीच जागा त्यांनी याआधी वेगवेगळ्या पक्षांच्या तिकिटावर जिंकलेली आहे. १९९० साली त्यांनी गोवा पीपल्स पार्टी, १९९५ साली युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी; तर १९९९ साली काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. ते दोन वेळा दक्षिण गोव्यातून खासदार राहिलेले आहेत. १९९६ साली यूजीडीपी, तर २००४ साली ते काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाले होते.

आलेमाओ यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला फटका?

दरम्यान, चर्चिल आलेमाओ यांच्या या निर्णयाचा काँग्रेसला फटका बसू शकतो, असे गोव्यातील राजकीय जाणकारांचे मत आहे. ते २०२४ साली दक्षिण गोव्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दक्षिण गोव्यातील ख्रिश्चन समाजाच्या मतदारांमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांनी आगामी लोकसभेची निवडणूक लढवल्यास काँग्रेसला फटका बसू शकतो; तर या निर्णयाचा भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa former chief minister churchill alemao quits tmc may join ajit pawar faction ncp prd