सोने तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश यांनी केरळमधील तीन प्रमुख सीपीआय (एम) नेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. स्वप्ना सुरेश यांनी एका मल्याळम टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हे गंभीर आरोप केले आहेत. स्वप्ना सुरेश यांच्या आरोपानंतर केरळातील राजकीय वातावरण तापलं आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर केरळमधील विरोधीपक्ष काँग्रेस आणि भाजपाचे नेते आक्रमक झाले असून त्यांनी संबंधित तिन्ही सीपीआय नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी मल्याळम टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतींमध्ये, स्वप्ना सुरेश यांनी केरळचे माजी अर्थमंत्री थॉमस आयझॅक, माजी मंदिर व्यवहार मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन या तीन नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संबंधित नेत्यांनी लैंगिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप स्वप्ना सुरेश यांनी केला. आयझॅक आणि सुरेंद्रन यांनी २०१६ ते २०२१ या कालावधीत पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील LDF सरकारमध्ये काम केलं आहे.

संबंधित तिन्ही नेत्यांशी ‘इंडियन एक्स्प्रेस’ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणावर केरळ सरकारनेही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. स्वप्ना सुरेश यांनी नुकतंच “पद्मव्यूह ऑफ ट्रीचरी” नावाचं पुस्तक प्रकाशन केलं आहे.

हेही वाचा- बाळासाहेबांची शिवसेनेचे वायफायसह हायफाय कार्यालय; राज्यातील पहिल्या पक्ष कार्यालयास काॅर्पोरेट वळण

स्वप्ना सुरेश यांच्या म्हणण्यानुसार, ”कडकमपल्ली सुरेंद्रन यांनी एका कार्यक्रमादरम्यान स्वप्ना सुरेश यांना कोची येथील हॉटेल रूममध्ये कथितपणे बोलवलं होतं. तर थॉमस आयझॅक यांनी तिला मुन्नार येथील थंड हवेच्या ठिकाणी भेटायला बोलावलं होतं. पी श्रीरामकृष्णन यांनी स्वप्ना सुरेश यांना आपल्या अधिकृत निवासस्थानी भेटण्यासाठी बोलवलं होतं” असे आरोप स्वप्ना सुरेश यांनी केले आहेत.

Story img Loader