गोंदिया : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर महायुतीने वर्चस्व प्रस्थापित केले. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार राजकुमार बडोले, तिरोडा भाजपचे विजय रहांगडाले, गोंदिया भाजपचे विनोद अग्रवाल आणी आमगावमधून भाजपचे संजय पुराम विजयी झालेत.
तिरोड्याची जागा भाजपने, तर अर्जुनी मोरगाव ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने कायम राखली. राष्ट्रवादी अजित पवार गटाने येथे पूर्वाश्रमीचे भाजप नेते राजकुमार बडोले यांना उमेदवारी दिली होती. आजपर्यंतच्या इतिहासात गोंदिया मतदारसंघातून भाजप उमेदवार कधीही निवडून आलेला नव्हता. तब्बल ६२ वर्षांनंतर येथे कमळ फुलविण्याचे भाजपचे स्वप्न विनोद अग्रवाल यांच्या माध्यमातून पूर्ण झाले. तिरोडा मतदारसंघात विद्यमान आमदार विजय रहांगडाले यांच्या बाजूने जनतेत नकारात्मकता असूनही आणि राष्ट्रवादीच्या बाजूने वातावरण असतानाही राष्ट्रवादीला विजय मिळविता आला नाही. रहांगडाले यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला. अनुसूचित जमातीकरिता राखीव असलेल्या आमगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय पुराम विजयी झाले.
हेही वाचा – ‘लाडकी बहीण’ प्रभाव या मतदारसंघात का चालला नाही ?
बंडखोर निष्प्रभ
अर्जुनी मोरगाव व आमगाव मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) व काँग्रेसच्या नेत्यांनी अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी केली होती. मात्र या बंडखोरांचा परिणाम फारसा दिसून आलेला नाही.
गोंदियात राहुल गांधींची सभा, मात्र काँग्रेसचा पराभव
गोंदियातील आघाडीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचाराकरिता राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली. मात्र, या सभेचा प्रभाव जाणवला नाही. धनलक्ष्मी योजनेची घोषणा करूनही महिला मतदारांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
हेही वाचा – गडचिरोलीत एक दशकानंतर काँग्रेसला संधी, आरमोरीची जागा गमावल्याने भाजपला धक्का
मनसे, वंचित, बसपचा प्रभाव नगण्य
जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत मनसे, बसप, वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिले होते. या उमेदवारांमुळे मतविभाजन होईल, असा अंदाज बांधला गेला. मात्र, मतदारांनी मनसे, वंचित, बसपला नाकारले. जिल्ह्यातील दलित, आदिवासी व मुस्लीम मतदारांनी महायुतीला मतदान केल्याचे निकालावरून जाणवते. महिला मतदारांकडून महायुतीला भरघोस मतदान झाल्याचेही स्पष्ट होते.