गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप अर्थात महायुतीकडून विनोद अग्रवाल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या मतदारसंघात अग्रवाल विरुद्ध अग्रवाल अशी थेट लढत होणार, असे सध्याचे चित्र आहे. मात्र, एखादा तुल्यबळ बहुजन चेहरा रिंगणात उतरल्यास दोन्ही अग्रवाल उमेदवारांसमोर त्याचे कडवे आव्हान असणार आहे.
या मतदारसंघात सवर्ण समाजाची मक्तेदारी मोडून शिवसेनेचे रमेश कुथे यांनी १९९५ आणि १९९९ मध्ये विजय प्राप्त केला होता. २००४ पासून या मतदारसंघात अग्रवाल यांचेच वर्चस्वस राहिले असून बहुजन उमेदवाराची मतदारसंघाला प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा वीस वर्षांनंतर पूर्ण होणार, अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचाच दबदबा ?
विनोद अग्रवाल आणि गोपालदास अग्रवाल या दोन्ही दिग्गजांनी गेल्यावेळी आपआपल्या पक्षाला रामराम ठोकून निवडणूक लढविली. परिणामी, गेल्या ५ वर्षांत बहुजन नेत्यांनीच भाजप व काँग्रेस संघटना सांभाळली. मात्र पक्षांना ‘अच्छे दिन’ येताच या नेत्यांनी पुन्हा प्रवेश करून आपली उमेदवारी निश्चित केली. यामुळे बहुजन पदाधिकाऱ्यांमध्ये डावलण्यात आल्याची भावना आहे.
गोंदिया मतदारसंघात बहुजन उमेदवार द्यावा, अशी मागणी गेल्या काही वर्षांत समोर आली आहे. भाजप आणि काँग्रेसमधील बहुजन पदाधिकाऱ्यांचा झालेला हिरमोड आणि मतदारसंघात बहुजन उमेदवाराबाबत करण्यात आलेली वातावरणनिर्मिती पाहता यंदाच्या निवडणुकीत दोन्ही प्रस्थापित उमेदवारांच्याविरोधात एखादा तुल्यबळ बहुजन उमेदवार रिंगणात उतरू शकतो, अशी चर्चा आहे. हा संभाव्य बहुजन समाजाचा उमेदवार दोघांपैकी कोणाचे राजकीय गणित बिघडवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा : नाना पटोलेंच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंडखोरीचे वारे, नेमके कारण काय?
भाजप, काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता
गोंदिया विधानसभा मतदारसंघात बहुजन मतदारांचे प्राबल्य आहे. कुणबी आणि पोवार समाजाची मते येथे निर्णायक ठरतात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपकडून बहुजन उमेदवार दिला जाईल, असे सांगितले जात होते. मात्र, निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच संपूर्ण चित्र पालटले. उमेदवारीसाठी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले मातब्बर नेते पुन्हा जुन्या पक्षांत परतले. यामुळे पक्षसंघटना वाढवण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या बहुजन समाजाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. बहुजन नेत्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. या असंतोषातून एखादा बहुजन समाजातील उमेदवार निवडणूक रिंगणात उभा ठाकण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास सर्वपक्षीय बहुजन नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते त्या उमेदवाराला मदत करतील आणि बहुजन मतदारही त्याच्या पाठिशी उभे राहतील, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. याचा फटका भाजप आणि काँग्रेसला बसण्याची दाट शक्यता आहे.