Gopal Shetty and Atul Shah Rebel : विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून भाजपमध्ये मुंबईत असंतोष असून माजी खासदार गोपाळ शेट्टी, माजी आमदार अतुल शहा हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. गेली अनेक वर्षे एकनिष्ठ राहून काम करूनही भाजपने अन्याय केल्याची त्यांची भावना आहे. आणखीही काही नेते मुंबईसह राज्यात अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करीत असून भाजपला मोठ्या बंडखोरीला तोंड द्यावे लागणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या मंगळवारच्या शेवटच्या दिवशी भाजप नेत्यांमधील असंतोष उफाळून आला असून ते अपक्ष म्हणून अर्ज दाखल करीत आहेत. उत्तर मुंबईचे माजी खासदार शेट्टी यांना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना सुरक्षित मतदारसंघ देण्यासाठी उमेदवारी नाकारली गेली. नाराज झालेल्या शेट्टी यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारून गोयल यांचे निवडणुकीत कामही केले. त्यांनी बोरीवली विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. पण पक्षाने शेट्टी आणि विद्यमान आमदार सुनील राणे यांना उमेदवारी नाकारून संजय उपाध्याय यांना दिली. त्यामुळे शेट्टी यांचे कार्यकर्ते चिडले असून त्यांनी सोमवारी सायंकाळी शेट्टी यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह केला होता. त्यामुळे शेट्टी निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांनी माघार घ्यावी, यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत.
हेही वाचा – ‘कमळा’ची लढत ‘मशाल’ टाळून, मराठवाड्यात भाजपला ठाकरे गटाचे आव्हान कमी; दोनच जागांचा अपवाद
अतुल शहा यांनी मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेटही घेतली होती. पण त्यांना उमेदवारी नाकारून शायना एनसी यांना देण्यात आल्याने अन्याय झाल्याने संतापलेल्या शहा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. मी गेली चाळीस वर्षे भाजपशी एकनिष्ठ राहून काम केले आहे. आमदारकीनंतर पक्षाने सूचना केल्यावर महापालिका निवडणूकही लढविली होती. पण मी स्थानिक उमेदवार असूनही अन्याय केला आहे. कुठल्याही विभागातील नेत्याला कोणत्याही भागात उमेदवारी द्यायची, हे चुकीचे धोरण आहे, उमेदवारी ही संगीत खुर्ची नाही, असे शहा यांनी ‘ लोकसत्ता ‘ शी बोलताना स्पष्ट केले.