दिगंबर शिंदे
सांगली : आटपाडी तालुक्याचे राजकारण माणगंगा साखर कारखाना निवडणुकीनंतर वेगळ्या वळणावर सध्या असून देशमुख वाड्यावर यामुळे दुहीची बीजे फुलतात की काय अशी शंकास्पद स्थिती निर्माण झाली आहे. देशमुखांच्या वाड्यावरील थोरली पाती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत तर धाकली पाती शिवसेना शिेंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या तंबूत सध्या दिसत आहेत. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी मतदार संघाचे पुढील आमदार म्हणून गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असून आमदार पडळकर यांनीही विधानसभेच्यादृष्टीने आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
खानापूर आणि आटपाडी या दोन तालुक्याचा मिळून एक विधानसभा मतदार संघ आहे. आतापर्यंत या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व विट्याच्या पाटील घराण्याने तर कधी आमदार बाबर यांनी केले होते.१९९५ मध्ये या जिल्ह्यातून प्रस्थापिताविरोधी असलेल्या मतप्रवाहामध्ये जिल्ह्यात पाच अपक्ष निवडून आले होते. यामध्ये आटपाडीतील देशमुख घराण्यातील राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याकडे मतदार संघाचे प्रतिनिधीत्व आले. देशमुखांनी त्यावेळी काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या आमदार अनिल बाबर यांचा पराभव केला होता. पाच पांडवांना सांगलीतून कुमक मिळाल्याने हा बदल झाला. यानंतर पुन्हा आमदार बाबर यांनी आपले स्थान बळकट केले असले तरी सदाशिवराव पाटील यांनी पुन्हा बाबरांना २००४ च्या निवडणुकीत पराभूत केले होते. पुन्हा गेल्या दोन निवडणुकीत बाबर यांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवत मतदार संघाचे प्रतिनिधीत्व आपणाकडे कायम ठेवले आहे.
आणखी वाचा-वाचाळ रमेश बिधुरींचा सचिन पायलटांविरोधात ध्रुवीकरणाचा डाव
आता मात्र, राजकीय स्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. मतदार संघातील अनेक राजकीय नेत्यांना आमदारकीची स्वप्ने पडत असून या दिशेने राजकीय वाटचाल सुरू असताना वेगवेगळी राजकीय समिकरणे उदयाला येत आहेत. माजी आमदार देशमुख यांचे चिरंजीव हर्षवर्धन देशमुख यांचे नेतृत्व रूजवायचे आहे. तर त्यांचे बंधू अमरसिंह उर्फ बापूसाहेब देशमुख यांनी एकवेळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली होती. तर युवा पिढीचे देशमुख यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून संधी मिळवली होती.
या मतदार संघाचे राजकारण केवळ बाबर, देशमुख, विट्याचे पाटील आणि खानापूरचे माने घराणे यांच्या नावावर चालत आले असले तरी आता काळ बदलला आहे. नवी पिढी उदयास आल्यानंतर बहुजन समाजातून आलेले नेतृत्व नव्या उमेदीने पुढे येत आहे. यामध्ये जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, विट्याचे वैभव पाटील ही काही नावे घेता येतील. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पडळकर यांच्या गटानेही चांगले यश मिळवत तालुक्याच्या राजकारणात हम भी कुछ कम नहीचा दाखला दिला आहे.
आणखी वाचा-विदर्भातील नेते प्रचारात; शेतकरी संकटात, व्यापाऱ्यांकडून लूट
माणगंगा कारखाना हे देशमुख गटाची दुखरी नस होती. सांगोल्याच्या देशमुख गटाने अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने कारखाना निवडणुकीत देशमुख गटालाही माघार घ्यावी लागली. यातून कारखाना तानाजी पाटील यांच्या ताब्यात गेला. कारखाना आर्थिकदृष्टया अडचणीत आल्याने त्याची नाराजीही देशमुख गटाला भोवते आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देशमुख गटाचा झालेला पराभवही याच राजकीय खेळीतून झाला होता. देशमुखांना पराभूत करून जिल्ह्याच्या राजकारण सक्रिंय झालेले तानाजी पाटील हे आमदार बाबर यांचे कार्यकर्ते असले तरी सध्या त्यांची वाटचाल स्वतंत्रपणे सुरू असल्याचे आणि त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा हात असल्याचा आरोप खुद्द देशमुख गटाकडून झाला होता.
तानाजी पाटील यांचे उपद्रव मुल्य लक्षात घेउन बाबर यांनी अमरसिंह देशमुख यांच्याशी जवळीक वाढवली आहे, तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी विटा शहरात बस्तान बसविण्यासाठी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याशी जवळीक साधली आहे. ही राजकीय तडजोड करीत असताना प्रत्येकाच्या डोळ्यात आमदारकीच स्वप्न आहे. विट्याच्या ग्रामीण भागात असलेले आमदार बाबर यांचे प्राबल्य, विटा शहरात असलेले पाटलांचे प्राबल्य, आटपाडीत देशमुखांचे आणि ग्रामीण भागात आमदार पडळकर यांचे वर्चस्व लक्षात घेता या आघाड्या भविष्य काळाच्या संघर्षाची बीजे ठरण्याचीच चिन्हे आहेत.