गडचिरोली : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या दारी शासनाच्या योजना पोहोचल्या असून राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले असून जिल्ह्याच्या ११ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली येथे जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमास मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, पद्मश्री परशुराम खुणे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शासनाच्या एक वर्षपूर्तीनंतर पहिलाच कार्यक्रम गडचिरोली येथे आयोजित केला आहे. ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना सर्वसामान्यांसाठी आहे, लोकांना सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागू नये यासाठी सरकारने हा उपक्रम सुरू केला. जिल्ह्याची लोकसंख्या ११ लाख असून जवळपास ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना सुमारे ६०१ कोटी रुपयांच्या विविध योजनांचा जिल्हा प्रशासनाकडून लाभ दिला जात आहे. शासन प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत, अधिकारी आता गावागावात जात असल्यामुळे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, अशी प्रचिती जनतेला येत आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जनतेपर्यंत शासन पोहोचले पाहिजे या संकल्पनेतून शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे. छत्तीसगड, झारखंडच्या धर्तीवर गडचिरोलीमध्येही स्टील सिटी उभी करण्याचे नियोजन आहे. गडचिरोलीमध्ये मोठे विमानतळ होण्यासाठी १४६ हेक्टर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ आणि समृद्धी महामार्ग यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास व्यक्त करतानाच जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्यामुळे विकास कामांना गती मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

‘दुय्यम वागणूक मिळाल्याने अजित पवार यांची वेगळी वाट’

गडचिरोली : ‘जेव्हा तुमच्यात क्षमता असते, पण वागणूक दुय्यम दर्जाची मिळते तेव्हा त्याचा अजित पवार होतो, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले.  नुकत्याच घडलेल्या सत्तानाटय़ानंतर शनिवारी गडचिरोली येथे ‘सरकार आपल्या दारी’ या उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आज अजित पवार ज्या परिस्थितीतून जात आहेत, मीपण त्या स्थितीतून गेलो आहे. राजकीय जीवनात ‘तोंडात अंजीर आणि हातात खंजीर’ ठेवणारी माणसे बेभरवशाची असतात. क्षमता असूनदेखील दुय्यम दर्जाची वागणूक मिळाल्याने मी वेगळी वाट धरली, अजित पवार यांनीदेखील तेच केले. घरी बसून कामे होत नाहीत. त्यासाठी बाहेर पडावे लागते, असा टोला लगावला.

Story img Loader