सध्या बिहारमध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. या संपूर्ण राजकीय रणधुमाळीत केंद्रस्थानी आहेत ते बिहारचे राज्यपाल फागु चौहान. ७१ वर्षीय फागु चौहान हे बिहारचे ४० वे राज्यपाल आहेत. जुलै २०१९ मध्ये लालजी टंडन यांच्या जागी त्यांची राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. राज्यपाल फागु चौहान हे मूळ बिहारच्या शेजारीच्या राज्यातील म्हणजे उत्तर प्रदेशातील आहेत.  उत्तर प्रदेशातील लोनिया समुदायाचे नेते असल्याने नरेंद्र मोदी सरकारने त्यांची निवड केल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी बिहारमध्ये निवडणुका होणार होत्या. त्यामुळेच राज्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या ओबीसी समाजातील लोकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने उचललेले चतुर पाऊल म्हणून याकडे पाहिले जात होते.

उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील घोसी येथून ते सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यावेळी चौहान यांच्या निवडीबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.  फागु हे गेल्या चार दशकांपासून यूपीच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी १९८६ मध्ये त्यांची पहिली विधानसभा निवडणूक दलित मजदूर किसान पक्षाच्या चिन्हावर जिंकली होती. १९९१ मध्ये ते जनता दलाच्या तिकिटावर आमदार झाले. १९९६ आणि २००२ मध्ये ते भाजपाच्या चिन्हावर विजयी झाले होते. त्यानंतर ते बसपामध्ये गेले आणि २००७ मध्ये घोसीमधून पुन्हा विजयी झाले. २०१७ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते सहाव्यांदा आमदार झाले. 

यूपीमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चौहान यांचा मुलगा रामविलास चौहान मधुबनमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आला होता. त्यांचा कार्यकाळ बहुतांशी अडथळ्यांशिवाय पार पडला आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये काही कुलगुरूंवर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चौहान यांच्यात मतभेद वाढत असल्याच्या बातम्या आल्या. नितीश यांनी कुलगुरूंवर कठोर कारवाई करण्यासाठी दबाव आणला होता. बिहारचे शिक्षण मंत्री विजय कुमार चौधरी यांनी त्यावेळी राजभवनातला कार्यक्रमही टाळला होता.

चौहान यांनी अखेर दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली आणि मगध विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या घरावर छापे टाकल्याबाबतचा विशेष दक्षता युनिटचा अहवाल मागवला होता. त्यांनी दरभंगा येथील कुलगुरूंवरील आरोपांची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये राज्यपालांनी छपरा येथील राजेंद्र कॉलेजच्या १२ सहाय्यक प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसोबत बॉलीवूडच्या गाण्यांवर नृत्य केल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तडकाफडकी निलंबित केले होते, ज्यामुळे त्यांच्याबर मॉरल पोलिसिंग” चे आरोप झाले होते. हा कार्यक्रम भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद ज्यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. त्यांच्याच नावावरून महाविद्यालयाचे नाव ठेवण्यात आले आहे. या वादाची निःपक्षपाती चौकशी करण्यात अपयशी ठरल्याबद्दल चौहान यांनी राजेंद्र महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या जय प्रकाश विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांना निलंबितही केले होते.

Story img Loader