राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी राज भवनात ‘राम कथे’चे आयोजन केले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारकांना कार्यक्रमाचे अध्यक्षपद देऊ केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशाप्रकारे राज भवनात राम कथेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तरीच कॉँग्रेस प्रणित सरकारने यावर अजून तरी टिपण्णी दिलेली नाही. भाजपाने देखील या संदर्भात कोणतेच भाष्य केले नसले तरीही पक्षाच्या काही नेत्यांनी पाच दिवसीय कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमात नियमितपणे विजय कौशल हे कथेचे वाचन संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत करणार असून उत्तर प्रदेशातील वृंदवनातून त्यांचे आगमन झाले आहे. पूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारकही होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कौशल यांच्या युट्यूब चॅनलवर होत असून हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला आहे. स्वत:च्या ओळख पत्रांची खात्री करून सामान्य नागरीकांना राज भवनात प्रवेश करू शकतात.
शनिवारी हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मिश्रा यांनी हिंदू देवता राम तसेच रामचरीतमानसाच्या पूजेचे आयोजन केले होते. तसेच राज्यपालांच्या हस्ते “भक्ती कला प्रदर्शनी” या कला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी भाजपाचे राज्य सभा खासदार घनश्याम तिवारी आणि जयपूरचे खासदार रामचरण बोहरा उपस्थित होते.
या संदर्भात राज भवनातून जारी झालेल्या वक्तव्यात मिश्रा यांना उद्देशून नमूद करण्यात आले आहे की, राम कथा नीतिमूल्यांसह जीवनाला समृद्ध करते. विजय कौशल यांनी ‘राम कथा’ ऐकविण्याच्या विनंतीला मान दिला हे परम भाग्य! कौशल यांच्याप्रमाणे मिश्रा देखील संघ प्रचारक होते आणि ते जयप्रकाश नारायण यांचे साथीदार होते. उत्तर प्रदेशातून १९६३ दरम्यान गोरखपूरमधून संघासह त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या कार्यावर जेपी यांच्या कार्याचा प्रभाव होता. कालांतराने त्यांनी भाजपाचे युनिट प्रमुख म्हणूनही पदभार भूषवला होता. ते राज्य आणि केंद्रात मंत्री होते. २०१९ दरम्यान त्यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मिश्रा यांच्याकडे घटनात्मक पद असून त्यांनी राज भवनात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी समाजातून रोष व्यक्त होतो आहे. त्यांची ही कृती भारतीय संविधानात नमूद “धर्मनिरपेक्ष मूल्याला” छेद देणारी असल्याची ओरड आहे. तसेच या कार्यक्रमाचे राज भवनात करण्यात आलेले आयोजन स्वतंत्र नागरी संघटनांना रुचलेले नसून त्यांनी हा कार्यक्रम इथून हलवून अन्यत्र कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी घेण्याविषयी सुचवले आहे.