तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि राज्यपाल आर.एन. रवी यांच्यातील संघर्ष चिघळला असून आता या वादात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनीही उडी घेतली आहे. राज्यपालानी राजकारणावर न बोलता घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यावर अधिक लक्ष दिले पाहीजे, अशी प्रतिक्रिया अन्नामलाई यांनी दिली आहे. राज्यपाल रवी यांनी तमिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना पदच्युत करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर एका आठवड्याच्या आतच अन्नामलाई यांची ही प्रतिक्रिया आल्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. सेंथिल बालाजी यांनी २०१५ साली नोकरी देण्याच्या बदल्यात लाच स्वीकारल्याचा आरोप करून ईडीने त्यांना अटक केली होती. सेंथिल बालाजी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२९ जून रोजी सेंथिल बालाजी यांना मंत्रिपदावरून हटविण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर चारच तासात त्यांनी घुमजाव केले होते. मंत्र्यांना नेमण्याचा किंवा हटविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्यामुळे राज्यपालांच्या एकांगी निर्णयामुळे राजभवन आणि राज्य सरकार यांच्यात तणाव निर्माण झाला होता. राज्यपालांच्या या निर्णयामुळे धक्क्यात गेलेल्या राज्य भाजपा संघटनेने दिल्लीशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली होती. केंद्रालादेखील राज्यपालांच्या निर्णयामधील घोडचूक आणि त्यामुळे निर्माण झालेल्या घटनात्मक पेचप्रसंगाची जाणीव आली होती.

हे वाचा >> सत्ताधाऱ्यांच्या दणक्यानंतर तमिळनाडूच्या राज्यपालांची माघार

बुधवारी चेन्नई येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी राज्यपालांच्या निर्णयावर नापंसती व्यक्त केली. राज्यपालांची कारवाई पक्षाच्या हिताची असली तरी राज्याच्या राजकीय वर्तुळात या निर्णयामुळे तीव्र नाराजी उमटली आहे. अन्नामलाई म्हणाले की, राज्यपालांनी राजकारणावर भाष्य करू नये. केंद्रात सत्ता असलेल्या पक्षाचा तमिळनाडू अध्यक्ष असल्याच्या नात्याने मी ठामपणे सांगतो की, राज्यपाल राजकारणावर बोलून चुकीचा पायंडा पाडत आहेत.

राज्यपाल माध्यमांशी वारंवार बोलत असून त्यांच्या बोलण्याला राजकीय छटा असल्याबाबतचा प्रश्न अन्नमलाई यांना माध्यमांनी विचारला. या प्रश्नाचे उत्तर देत असताना ते म्हणाले की, “राज्यपालांनी द्रमुक सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली असती तर मला आनंद झाला असता. पण मला वाटते राज्यपालांची ही भूमिका विवेकी नाही. राज्यपाल राजकारणावर बोलून द्रमुक पक्षाला लक्ष्य करत आहेत आणि पक्षाला हे आवडत आहे, अशातला काही भाग नाही. राज्यपालांनी फक्त घटनात्मक चौकटीपुरतेच मर्यादीत राहिले पाहीजे.”

राज्यपाल रवी यांनी मंत्र्यांना परस्पर पदच्युत केल्यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी निषेध व्यक्त केला. तसेच राज्यपालांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली. “तुम्ही एवढा मोठा निर्णय घेण्याआधी कायदेशीर मत घेतले नाहीच, राज्यघटनेच्या विरोधात जाऊन तुम्ही तुच्छ व्यवहार केला”, अशा शब्दात त्यांनी राज्यपालांचा निषेध केला. राज्यपाल रवी यांच्या निर्णयावर राज्य भाजपाने असहमती दर्शवून केंद्राला ताबडतोब या निर्णयाबद्दलची माहिती दिली आणि केंद्रीय नेतृत्वाने यात लक्ष घालून त्यांचा वादग्रस्त निर्णय मागे घेण्यास सांगावे, अशी मागणी केली.

हे ही वाचा >> ‘माजी आयपीएस, भाजपा नेते के. अन्नामलाई अनियंत्रित व्यक्ती की गुप्त शस्त्र’, भाजपाची नेमकी गोची कुठे झाली?

राज्य भाजपाने राज्यपालांच्या निर्णयावर नापसंती व्यक्त केली असली तरी जाहीरपणे बोलण्यास अन्नामलाई यांनी नकार दिला. हे प्रकरण कायदेशीर लढाईनंतरच निकाली निघेल, अशी प्रतिक्रिया अन्नामलाई यांनी दिली. तसेच मंत्री सेंथिल बालाजी यांना मुख्यमंत्री स्टॅलिन वाचवत असल्याचीही टीका त्यांनी केली. अन्नामलाई हे द्रमुकचे कट्टर विरोधक असूनही गेल्या काही दिवसांपासून ते राज्यपाल रवी यांच्यावर जाहीर निशाणा साधताना दिसत आहेत. राजभवनातून जे वादग्रस्त मुद्दे उपस्थित केले जात आहेत, त्याचा अनवधानाने द्रमुकला लाभ मिळत असल्याचे चित्र दिसल्यामुळे अन्नामलाई यांनी राज्यपालांच्या विरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली.

यावर्षी जानेवारी महिन्यात, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अभिभाषण करत असताना राज्यपालांना विधानसभेतून रागारागाने काढता पाय घ्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी तमिळनाडूचे नामकरण ‘तामिजगम’ असे करण्याचा प्रस्ताव दिला. अन्नामलाई यांनी तेव्हादेखील एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, राज्यपालांची मागणी अनावश्यक आणि अनुत्पादक अशी आहे. तसेच तमिळनाडूच्या चिन्हाशिवाय पोंगल उत्सवाचे निमंत्रण देण्याचा राजभवनाचा निर्णय चुकीचा असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

हे वाचा >> विश्लेषण: तामिळनाडू की तामिजगम? मद्रास नाव सोडल्यानंतर पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा का पेटला?

राज्यपालांनी सेंथिल बालाजी यांच्यावर केलेल्या कारवाईबाबत काही वरिष्ठ भाजपा नेत्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, वरकरणी राज्यपालांची कृती द्रमुकच्या विरोधात दिसत असली तरी या निर्णयामुळे भाजपाचे नुकसानच होणार असून त्याचा थेट लाभ द्रमुक पक्षाला होईल. सेंथिल बालाजी यांना पदच्युत करण्याच्या निर्णयाबाबत बोलत असताना भाजपाच्या नेत्याने राज्यपालांकडे सामान्य व्यवहारज्ञानाचा अभाव असाव असल्याची टीका केली.

राज्य सरकारचे मंत्री सेंथिल बालाजी यांना अटक झाल्यानंतर द्रमुक पक्ष तणावात होता. मुख्यमंत्री स्टॅलिनदेखील वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. पण अचानक राज्यपाल रवी यांनी कोणतीही खातरजमा न करता किंवा कायदेशीर सल्ला न घेता अनावश्यक असा निर्णय घेतला. त्यानंतर संपूर्ण वातावरण द्रमुकच्या बाजूने फिरले. भाजपाने राज्य सरकारविरोधात वातावरणनिर्मिती केली होती, त्याला कुठेतरी छेद देण्याचे काम राज्यपालांच्या निर्णयामुळे झाले, अशी टीका भाजपामधील एका वरिष्ठ नेत्याने केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governor shouldnt talk politics says bjp state president k annamalai amid ravi vs stalin govt showdown kvg
Show comments