‘‘देशवासीयांत न्यूनगंड निर्माण करण्यासाठी दुर्दैवाने इतिहासाच्या नावाखाली काल्पनिक कथा शिकवल्या जात आहेत,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. भारताला यशोशिखरावर पोहोचवायचे असेल तर भूतकाळातील संकुचित दृष्टिकोनातून बाहेर पडावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. शीख गुरू गोविंदसिंग यांच्या पुत्रांच्या हौतात्म्याबद्दल त्यांना आदरांजली व अभिवादन करण्यासाठी त्यांचा हौतात्म्यदिन ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळला जाणार आहे. अमृतसर मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम’मध्ये पहिल्या वीर बाल दिनानिमित्त आयोजित सोहळय़ात मोदी बोलत होते. यावेळी सुमारे ३०० मुलांनी सादर केलेल्या कीर्तनात मोदी सहभागी झाले होते.
यंदा गुरू गोविंदसिंग यांच्या प्रकाशपर्वानिमित्त ९ जानेवारी रोजी केंद्र सरकारने साहिबजादा बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा ‘वीर बाल दिवस’ पाळण्याचे जाहीर केले होते.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमात सहभागी झाले होते. मोदींनी आपल्या धार्मिक श्रद्धांच्या रक्षणार्थ हुतात्मा झालेले गुरु गोविंदसिंग यांचे पुत्र जोरावर सिंग व फतेह सिंग यांना आदरांजली वाहिली.
मोदी म्हणाले, की हा दिवस आपल्या अभिमानास्पद भूतकाळाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व भविष्यासाठी प्रेरक म्हणून महत्त्वाचा आहे. बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांचे विचार येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. मात्र, आपले दुर्देव आहे, की अशा वीर योद्धांना इतिहासात दुर्लेक्षीत करण्यात आलं आहे. इतिहासाच्या नावाखाली आपल्याला काही ठराविक गोष्टीच शिकवण्यात आल्या. मात्र, आता ही चूक सुधारण्याची संधी आहे. जर भारताला यशाच्या नव्या उंचीवर जायचं असेल, तर आपल्याला इतिहासातील संकुचित मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल”, असंही मोदींनी म्हटलं आहे.
मात्र पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर शिरोमणी गुरुद्वार प्रबंधक कमेटी(एसजीपीसी) प्रमुख हरजिंदर सिंह धामी यांनी शीख समुदायास सांगितले की, गुरु गोविंद सिंह यांच्या पुत्रांचा हुतात्मा दिवस हा ‘वीर बाल दिवस’ ऐवजी ‘साहिबजादे हुतात्मा दिवस’ म्हणून साजरा करावा.
धामी यांनी म्हटले की, शीख समाजाच्या परंपरेच्या विरोधात जाऊन भारत सरकारने साहिबजादांचा हुतात्मा दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करणे हा जगातील धार्मिक इतिहासातील महान हौतात्म्य आणि मौल्यवान वारसा कमकुवत करण्याचे द्वेषपूर्ण षडयंत्र आहे. सरकारला जर खरंच साहिबजादे यांना श्रद्धांजली अर्पण करायची असेल, तर हा दिवस साहिबजादे हुतात्मा दिन म्हणून साजरा करायला काय हरकत आहे.