हर्षद कशाळकर
अलिबाग : पक्षांतर्गत बंडखोरी शेकापला चांगलीच भोवली आहे. वेश्वी आणि नवेदर नवगाव या दोन्ही ग्रामपंचायती शेकापने गमावल्या आहेत.अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव आणि वेश्वी ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत शेकापचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. वेश्वी ग्रामपंचायतीत पक्षाला पक्षांतर्गत बंडखोरीला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत गोंधळपाडा गावातून यंदा सरपंचपदाचा उमेदवार दिला जावा अशी मागणी स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र शेकाप पक्षनेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष केले. पुन्हा एकदा वेश्वीच्या प्रफुल्ल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे स्थानिक पातळीवर दोन गट पडले. विरोधकांनी ही संधी हेरली, आणि स्थानिक विकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे शेकापचा एक गट विरोधकांच्या कंपूत जाऊन मिळाला.
खरेतर सरपंचपदासाठी गोंधळपाडावासींयाची मागणी रास्त होती. कारण आजवर झालेल्या निवडणुकीत कधीही त्यांना गावाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नव्हती. हीबाब लक्षात घेऊन स्थानिक विकास आघाडीने यंदा गोंधळपाड्यातील गणेश गावडे यांना सरपंचपदाची उमेदवारी दिली. हा निर्णय डाव पालटणारा ठरला. गावकऱ्यांनी स्थानिक अस्मितेचा मुद्दा करून गावडे यांना एक गठ्ठा मतदान केले. वेश्वी गावातील शेकापमधील असंतुष्टांनी त्यात हातभार लावत भर घातली. त्यामुळे शेकापच्या प्रफुल्ल पाटील यांचा पराभव झाला. शिंदे गटातील आमदार महेंद्र दळवी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून शेकापची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मतदानाच्या दिवशी स्वतः तळ ठोकून बसले. याचा परिणाम निकालात दिसून आला. दुसरीकडे शेकाप मात्र स्थानिक मुद्दे आणि परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, निवडणुकीत आमदार दळवी यांना लक्ष्य करत राहिली. ही देखील शेकापची मोठी चूक ठरली.
हेही वाचा : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांचा बंडखोर नेत्यांना झटका
नवेदर नवगावमध्येही स्थानिक आघाडीच्या प्रियांती घातकी यांनी शेकापच्या अंकीता जैतू यांचा पराभव केला. महत्त्वाची बाब म्हणजे सरपंचपदासह दोन प्रभागातून त्या सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी उभ्या होत्या तिन्ही ठिकाणी त्या निवडून आल्या. प्रियांती घातकी शेकापचे कट्टर कार्यकर्ते आणि माजी सरपंच कर्ण कटोर यांच्या कन्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांना सहानुभूती मिळाली. जवळपास ४५ वर्ष या ग्रामपंचायतीवर वर्चस्व होते. त्यानंतर आरक्षणामुळे गेली १५ वर्ष ग्रामपंचायतीवर प्रशासकराज होते. याच काळात ग्रामपंचायतीवरची शेकापची पकड सैल होण्यास सुरवात झाली. आमदार महेंद्र दळवी यांनी त्याचा अचूक फायदा उचलला. आधी पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषद मतदारसंघावर पकड निर्माण केली. आता ग्रामपंचायतीवर निर्णयक वर्चस्व मिळवले.
हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?
खटारा आणि कपबशी
शेकापकडे पूर्वी खटारा निवडणूक चिन्ह होते. मध्यंतरीच्या काळात ते चिन्ह गोठवले गेले होते. या काळात शेकापने कपबशी हे चिन्ह घेतले होते. या चिन्हावर शेकापने अनेक निवडणूका लढवल्या आणि जिंकल्या होत्या. पण नंतर त्यांना निवडणूक आयोगाने खटारा चिन्ह बहाल केले. पण खटारा चिन्ह घेऊन लढवलेल्या निवडणूकांमध्ये शेकापला फारसे यश आले नाही. या निवडणूकीत पुन्हा एकदा त्याचीच प्रचीती आली. स्थानिक विकास आघाडीने सरपंचपदाची निवडणूक शेकापचे पूर्वीचे चिन्ह असलेल्या कपबशी या चिन्हावर लढवली. तर शेकापच्या उमेदवारांनी खटारा चिन्ह वापरले. शेकापची दोन्ही चिन्ह एकमेकांविरोधात लढली. यात कपबशी सरस ठरली.