संजय मोहिते
बुलढाणा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी संपली असली तरी दावे-प्रतिदावे यांचा उडालेला धुराळा अजून हवेत कायम आहे. २१ जागा बिनविरोध व ७ ठिकाणी अर्जच नसणे यामुळे प्रत्यक्षात २५१ सरपंच पदासाठीच लढती झाल्या. मात्र राजकीय पटलावर नव्याने आगमन झालेल्या शिंदे गट-भाजप, ठाकरे सेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केलेले दावे लक्षात घेतले तर सहाशे-सातशे जागांसाठी निवडणूक झाली की काय, असा प्रश्न उपस्थित झालाय.
मात्र तटस्थ राजकीय जाणकारांची मते लक्षात घेतली तर, या निवडणुकांनी अर्थात ३ लाखांवर मतदारांनी सर्वच पक्षांना उभारी दिल्याचे चित्र आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या धक्कादायक सत्तांतरामुळे दोन पक्ष सत्ताधारी झाले तर आघाडीचे तीन पक्ष विरोधक ठरले. मात्र योगायोगाने म्हणा किंवा संयोगाने म्हणा या सर्वांचे पक्ष संघटनकडे दुर्लक्ष झाले आहे. कोणी हवेत उडाल्याने तर कोणी हवेतून जमिनीवर आल्याचा हा परिणाम ठरावा. मात्र सरपंचपदाची निवड थेट जनतेतून असल्याने पक्ष जागृत झाले आणि विस्कळीत संघटन काहीसे रुळावर आले.
हेही वाचा: रायगडात मतदारांवर छाप पाडण्यात काँग्रेस पुन्हा अपयशी
ग्रामपंचायत निवडणुकीचा हा सकारात्मक परिणाम ठरला आणि निकाल पाचही प्रमुख पक्षांना उभारी देणारा ठरला. तसेच या सर्व पक्षांची काही तालुक्यात वाताहतही झाल्याने ही निवडणूक नेत्यांना भानावर आणणारी ठरू शकते. निकालाच्या जिल्ह्यातील राजकारणावर होणाऱ्या या परिणामातून खासदार, ७ आमदार आणि पदाधिकारी काही धडा शिकतात का, हा प्रश्न आहे. अन्यथा, भावी निवडणुकांत मतदार त्यांना ‘धडा’ शिकवण्याची शक्यता नाकारत येत नाही. २०२३ हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वर्ष राहणार आहे.
हेही वाचा: सुनील शेळके : मावळचे ‘जनसेवक’
जिल्हा परिषदेच्या जागा ६० वरून ६८ आणि १३ पंचायत समित्यांच्या जागा १२० वरून १३६ गेल्या आहेत. नवीन वर्षात होणाऱ्या ९ पालिकांच्या निवडणुकात प्रभागांची संख्या वाढलेली राहणार आणि अध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार आहे. यामुळे केवळ कार्यकर्तेच नव्हे नेत्यांचाही पुन्हा कस लागणार आहे. लोकसभेपूर्वी लोणार व सिंदखेडराजा पालिकांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यात विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नवीन वर्षात आहेच. म्हणजे पुढील २ वर्षे निवडणुकांची आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकांनी राजकारण्यांना भावी काळातील आव्हाने काय असतील, हे दाखवून दिले आहेच.