हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग: रायगड जिल्ह्यात नुकतीच २४० ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे अपयश पुन्हा एकदा अधोरेखित झाले. २४० पैकी जेमतेम तीन ग्रामपंचायतींवर स्वबळावर सत्ता मिळवण्यात पक्षाला यश आले. महाड मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याच्या पक्षाच्या निर्णयलाही मतदारांनी फारसे स्विकारले नाही.

बुडत्याचा पाय आणखिन खोलात असे म्हणतात. याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला सध्या येत आहे. बॅरीस्टर अंतुले, माणिकराव जगताप आणि मधुकर ठाकूर यांच्यासारख्या नेत्यांच्या निधनानंतर पक्षाची नाव भरकटायला सुरवात झाली आहे. दांडगा जनसंपर्क असलेला एकही नेता पक्षात उरलेला नाही. त्यामुळे ज्या रायगडातून एके काळी काँग्रेसचे तीन ते चार आमदार निवडून येत होते. तिथे ग्रामपंचायती जिंकतांनाही पक्षाची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: सुनील शेळके : मावळचे ‘जनसेवक’

जिल्ह्यात नुकतीच २४० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. यात बाळासाहेबांच्या शिवसेनेला सर्वाधिक ७९ ग्रामपंचायती मिळाल्या. त्याखालोखाल महाविकास आघाडीने ३९. राष्ट्रवादी काँग्रेस ३०, शेतकरी कामगार पक्ष ३०, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट २३, भारतीय जनता पार्टी १८ काँग्रेस ३ ग्रामंपचायतींवर वर्चस्व मिळावले. तर १८ ठिकाणी अपक्ष तथा स्थानिक आघाडीचे उमेदवार निवडून आले. यावरून मतदारांवर प्रभाव टाकण्यात काँग्रेस पक्ष सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. यापुर्वी झालेल्या निवडणूकांमध्ये पक्षाची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. जिल्हा परिषद असो अथवा विधानसभा निवडणूक पक्षाचा आलेख हा कायमच उतरता राहीला आहे. त्यामुळे पक्षावर आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे.

रामशेठ ठाकूर आणि रविशेठ पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पनवेल आणि पेण विधानसभा मतदारसंघात पक्षाला उतरती कळा लागली होती. नंतर बॅरीस्टर ए. आर अतुलेंचा श्रीवर्धन मतदारसंघ पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात दिला. मधुकर ठाकूर यांच्या निधनानंतर अलिबागमध्ये काँग्रेसला घरघर लागली. तर पक्षाची ताकद असलेल्या महाड विधानसभा मतदारसंघात माणिक जगताप यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यातच पक्षाची वाताहत सुरु असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. पक्षाला एकसंघ टिकवून ठेवेल, संघटनात्मक बांधणी नव्याने करेल असे एकही नेतृत्व जिल्ह्यात शिल्लक राहिलेले नाही. प्रदेश पातळीवरूनही संघटनेला उभारी देण्याचे प्रयत्न होतांना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर सोयीस्कर भुमिका घेण्याकडे कार्यकर्त्यांचा कल वाढत चालला आहे. ज्या शेकाप विरोधात काँग्रेसने कायम लढत दिली. त्याच शेकापशी जुळवून घेण्याचे धोरण अलिबाग मध्ये पक्षाच्या मुळावर आल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: रश्मी शुक्ला यांच्या मनसुब्यांवर पाणी ?

संघटनात्मक बांधणी असलेल्या महाड मध्ये काँग्रेसने कायमच स्वबळावर निवडणूका लढवत आजवर यश संपादन केले होते. त्यामुळे पक्षाची ताकद टिकून राहीले होते. पण यावेळी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणूका लढण्याचा निर्णय घेतला. पण महाड आणि पोलादपूर तालुक्यात तरीही फारसे यश मिळाले नाही. याउलट सवाणे, नडगाव आणि कांबळे या सारख्या ग्रामपंचायती पक्षाने गमावल्या. ज्या ग्रामपंचायती जिंकल्या त्याचे श्रेय महाविकास आघाडीकडे गेले.

हेही वाचा: ठाकरे गटाच्या प्रभागनिहाय बैठका तर, शिंदे गटाचा प्रशिक्षण वर्गांवर भर

शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेब पडून नव्याने स्थापन झालेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला चांगले यश मिळते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपलाही ग्रामपंचायती जिंकता येतात. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटालाही स्वतःचे अस्तित्व राखता येते. पेण मध्ये शेकापला चांगले यश मिळते मग काँग्रेसच्या पदरीच निवडणूकीत का निराशा येते याची उत्तरे पक्षनेतृत्वाला आगामी काळात शोधावी लागणार आहेत. पक्ष इतरांच्या दावणीला बांधण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा लागणार आहे. अन्यथा पक्षाचा अपघात अटळ आहे असेच म्हणावे लागेल.