अत्यंत किरकोळ शरीरयष्टी, डोळ्याला काड्यांचा चष्मा, खुरटलेली काळी-पांढरी दाढी, कपाळावर टिळा, साधा शर्ट-पॅन्ट अशा एकदम सामान्य वेशभूषेतील नीलेश ज्ञानदेव लंके यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या पोटात शिरण्याची आणि लोकांत मिसळण्याची विलक्षण हातोटी आहे. शिवाय तितक्याच कौशल्याने ते आधुनिक समाज माध्यमांचाही वापर करतात. थोडक्यात म्हणजे रूप साधे मात्र अंगी नाना कळा. अशा या सामान्य परिस्थितीतील कार्यकर्त्याने ग्रामपंचायतीचा सरपंच ते आमदार आणि आता खासदार अशी भरारी घेतली आहे.

सुरुवातीला शिवसेनेचे आमदार विजय औटी यांचे कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. पुढे तालुकाप्रमुख झाले. पंचायत समिती सदस्य निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्यांनी त्याच जागी पत्नी राणी लंके यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडूण आणले. तत्कालीन आमदार औटी आणि लंके यांची कार्यशैली परस्परविरोधी. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सन २०१८ मधील पारनेर दौऱ्यात झालेल्या दगडफेकीचे खापर लंके यांच्यावर फोडण्यात आले आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. त्याचवेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेससाठी पारनेरमध्ये उमेदवाराच्या शोधात होतेच. लंके यांनी लगेच विधानसभेसाठी औटी यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल करत दणदणीत विजयही मिळवला.

आणखी वाचा-निवडणुकीतील अपयशानंतर पश्चिम बंगाल भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कारण काय?

आमदार झाल्यानंतर एकाचवेळी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या तिघांशीही त्यांनी जवळचे संबंध निर्माण केले. त्यामुळे तिघांपैकी कोणी ना कोणी सातत्याने लंके यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत. प्रसंगी औटी यांच्याशी पुन्हा तडजोडी परत त्यांनी पालिका, बाजार समितीवरही वर्चस्व मिळवले. करोना कालावधीत रुग्णांवरील उपचारासाठी सुरू केलेल्या केंद्राचा, तेथील कार्यपद्धतीचा सर्वत्र जसा गवगवा झाला तसाच त्याबद्दल वेगवेगळे प्रवादही निर्माण झाले.

राष्ट्रवादी फूटीवेळी सुरुवातीला शरद पवारांकडे गेलेल्या लंके यांनी थोड्याच दिवसांत अजित पवार गटात प्रवेश केला आणि महायुती सरकारकडून पारनेरच्या विकासकामांसाठी निधी मिळवला. मात्र, पुढे पुन्हा लोकसभेची संधी दिसताच शरद पवार यांच्या हाकेला साद देत गट बदलला. एकूणच गट बदलत राजकीय प्रगतीची प्रत्येक संधी पदरात पाडण्याची राजकीय हुशारी लंके यांच्याकडे आहे.

आणखी वाचा-कोण आहेत लोकसभेचे ७ अपक्ष खासदार? त्यांची साथ एनडीएला की इंडिया आघाडीला?

यंदाच्या लोकसभेवेळीही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचे चिरंजीव असलेल्या सुजय विखे यांच्याविरुद्ध उमेदवारी करत नीलेश लंके यांनी विखे कुटुंबीयावर मात करण्याची शरद पवार यांची इच्छा फलद्रुप केली आणि स्वतःची ‘जायंट किलर’ म्हणून ओळख निर्माण केली.