सतिश कामत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील उदय सामंत आणि योगेश कदम या दोन वजनदार आमदारांनी बंडखोरी करूनही उध्दव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी बहुसंख्य गड शाबूत ठेवत बंडखोर नेत्यांना झटका दिला आहे. त्याचबरोबर, गुहागर तालुक्यात भाजपाकडे असलेल्या दोन ग्रामपंचायतीही ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने खेचून आणल्या आहेत.

जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या ३६ ग्रामपंचायतींपैकी किमान २२ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचा भगवा फडकल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर, गुहागर तालुक्यात भाजपाकडे असलेल्या दोन ग्रामपंचायतीही ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने खेचून आणल्या आहेत. मंत्री सामंत यांच्या मतदारसंघात शिंदे गटाला हार पत्करावी लागल्याने मोठा धक्का बसला आहे. मात्र मंडणगड आणि खेड तालुक्यात माजी मंत्री रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश यांनी १० पैकी ८ ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळवत शिंदे गटाला दिलासा दिला आहे. मंडणगड तालुक्यातील प्रतिष्ठेच्या असणाऱ्या दोन ग्रामपंचायतींवर आमदार योगेश कदम यांचे वर्चस्व असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. घराडी गट ग्रामपचायतींच्या सरपंचपदी सुलभा प्रमोद चव्हाण, तर निगडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सईदा मुराद कोंडेकर लोकनियुक्त थेट सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.

हेही वाचा : सुजय विखे – नीलेश लंके यांच्यातील खडाखडीने नगरचे राजकारण तापले

खेड तालुक्यातील ९ पैकी ८ ग्रामपंचायतींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने वर्चस्व प्राप्त केले असल्याचा दावा दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी केला आहे. पण या निवडणुकांपैकी खेड तालुक्यात आस्तान ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. तेथे शिंदे गटाचा सरपंचपदाचा उमेदवार केवळ एका मताने विजयी झाला आहे.

गुहागर तालुक्यातील अंजनवेल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये १० वर्षे सरपंच असलेल्या भाजपाप्रणित यशवंत बाईत यांच्या गाव पॅनेलचा पूर्णपणे पराभव झाला. ठाकरे गटाने पुरस्कृत गाव पॅनेलचे सरपंचपदासह ९ ग्रामपंचायत सदस्य निवडून आणले. वेलदूर या भाजपचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतीवरही शिवसेना पुरस्कृत गाव पॅनेलचा सरपंच आणि एक सदस्य निवडून आला. अशा प्रकारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी प्रस्थापित भाजपला मोठा धक्का देत आपली पकड कायम ठेवली आहे.

हेही वाचा : भारत जोडो यात्रेत शरद पवार, उद्धव ठाकरे सहभागी होणार; काँग्रेस नेत्यांचे स्वीकारले निमंत्रण

मंत्री सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघातील शिरगाव ग्रामपंचायतीवर सरपंचपदावर ठाकरे गटाच्या उमेदवार फरीदा काझी विजयी झाल्या असल्या तरी शिंदे गटाने येथे १७ पैकी १४ जागा जिंकून एकतर्फी बहुमत प्राप्त केले. पोमेंडीमध्येही ११ पैकी ५ जागा शिंदे गटाने मिळवल्या. मात्र फणसोप ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपद गमावण्याबरोबरच या गटाचा फक्त एक सदस्य निवडून आल्याने मोठा पराभव स्वीकारावा लागला. विशेषतः, ठाकरे गटाचे पॅनेल प्रमुख राकेश साळवी यांना रोखण्यासाठी शिंदे गटाने दबाव तंत्राचाही वापर केला होता. पण निष्ठावंत शिवसैनिकांनी तो झुगारून देत पुन्हा एकदा या ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाचा भगवा फडकवला. म्हणूनच सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत विजयी झालेल्या या गटाच्या उमेदवार राधिका साळवी निकालानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, काहींनी आम्हाला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही जनतेशी प्रामाणिक होतो. जनतेच्या प्रत्येक सुख-दुःखात त्यांच्याबरोबर होतो. त्याचे फळ या निवडणूक निकालाने मिळाले आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासह ११ पैकी १० जागा ठाकरे गटाने जिंकत घवघवीत यश मिळवले. पोमेंडी ग्रामपंचयातीत ठाकरे गटाने सरपंचपदासह निसटते बहुमत मिळवले असले तरी येथे शिंदे गटानेही चांगली झुंज दिली. सरपंचपदाच्या तिरंगी लढतीमध्ये ठाकरे गटाच्या ममता जोशी १ हजार १३७ मते घेऊन विजयी झाल्या.

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

लांजा तालुक्याचे आमदार आणि ठाकरे सेनेचे उपनेते राजन साळवींच्या नेतृत्वाखाली राजापूर व लांजा या दोन्ही तालुक्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे दणदणीत यश मिळवले. लांजा तालुक्यामध्ये १५ पैकी ९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाने भगवा फडकवत ठेवला आहे. शेजारच्या राजापूर तालुक्यातही १० ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायतींवर घवघवीत यश मिळवले.रत्नागिरी तालुक्यातील तिन्ही ठिकाणी सरपंचपदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होणे आणि दोन ठिकाणी बहुमत मिळणे, हा या मतदारसंघाचे आमदार व राज्याचे उद्योगमंत्री सामंत यांच्यासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. कारण शिंदे सरकारने बदललेल्या निर्णयानुसार सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत संबंधित गावांमध्ये सर्व ग्रामस्थांनी मतदान केले. तेथे सामंत यांचे उमेदवार पराभूत करून या मतदारांनी एक प्रकारे नेतृत्वाबद्दल नाराजीच व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grampanchayat election result ratnagiri thackeray group shinde group uday samant yogesh kadam bhaskar jadhav print politics news tmb 01