संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असतानाच राज्यात भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गटाची महायुती तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट -शिवसेना ठाकरे गट यांची ‘इंडिया’ आघाडी या दोन्ही आघाड्यांमधील तीन पक्षांमध्ये जागावाटप करताना त्रांगडे निर्माण होणार आहे. प्रत्येक पक्षाला अधिकच्या जागा हव्या असल्याने दोन्हीकडे जागावाटप ही प्रक्रिया सोपी नसेल.

लोकसभा निवडणुकीची भाजपने तयारी सुरू केली आहे. कोणत्या मतदारसंघातील परिस्थिती कशी असेल याचे सारी माहिती जमा केली जात आहे. पक्षाच्या वतीने मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. राष्ट्रवादी महायुतीमध्ये सहभागी झाल्याने जागावाटपाचे नियोजन त्या पद्धतीने करावे लागणार आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप २५ तर शिवसेना २३ जागांवर लढले होते. भाजप २५ किंवा कमी जागा लढणार नाही. भाजप २५ ते ३० जागा लढण्याचे नियोजन करीत आहे. उर्वरित १८ जागा या शिंदे गट आणि राष्ट्रवादीला वाटून दिल्या जातील. शिवसेनेच्या गेल्या वेळी १८ जागा निवडून आल्या होत्या. पण नव्या समीकरणात भाजप शिंदे गटाला एवढ्या जागा सोडण्याची शक्यता कमी आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीचे चार खासदार खासदार निवडून आले होते. अजित पवार गटाला या चार जागा तर हव्या आहेतच पण याशिवाय अधिक जागांवर दावा आहे. भाजपने शिंदे गटाला १० ते १२ तर अजित पवार गटाला पाच-सहा जागा सोडण्याचे नियोजन केले आहे. महायुतीमध्ये जागावाटप हे सारे अमित शहा यांच्या पातळीवर होईल. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घासाघीस करायला फारसा वाव नसेल, असेही भाजपच्या सूत्राकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-सुनील देवधर, सी. टी. रवी यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून उचलबांगडी; विनोद तावडे, पंकजा मुंडे कायम

महायुतीमध्ये अमरावतीची जागा कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या मतदारसंघाच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी गेली चार वर्षे भाजपला साथ दिली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. या साऱ्या घडामोडी नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळण्यासाठी अनुकूल आहेत. पण स्थानिक भाजपच्या नेत्यांचा राणा यांना विरोध आहे. यामुळे दिल्लीच्या पातळीवरच अमरावतीचा निर्णय होईल, असेही भाजपमध्ये बोलले जाते.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद घटली आहे. परिणामी इंडिया किंवा महाविकास आघाडीतील सारीच समीकरणे बदलली आहेत. भाजपबरोबर युतीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. यामुळे या जागांवर उद्धव ठाकरे आग्रही राहणार हे निश्चित असेल. राष्ट्रवादी नेहमीच जागावाटपात शेवटपर्यंत घोळ घालते हा अनुभव आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना कमकुवत झाल्याने काँग्रेसला अधिक जागांची अपेक्षा आहे. इंडियामधील जागावाटप सोपे व सरळ नाही.

आणखी वाचा-“मुस्लिमांशी हजार वर्षे लढलो, पण ब्रिटिशांनी १५० वर्षांत..,” दत्तात्रेय होसबळेंनी दिला दाखला 

महायुतीत अमित शहा यांच्या शब्दाबाहेर शिंदे वा अजित पवार जाणार नाहीत. इंडियामध्ये मात्र आनंदीआनंद असेल असेच एकूण चित्र आहे. निवडणुकीला अद्याप ९ महिन्यांचा कालावधी असल्याने आणखी काय समीकरणे बदलतात यावरही सारे अवलंबून असेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grand alliance and the issue of seat allocation in the nda and india print politics news mrj
Show comments